नागपूरला SBL कंपनीत भीषण स्फोट; १७ ठार, १८ जण जखमी; दारुगोळा तयार करताना सकाळी घडली घटना 
महाराष्ट्र

नागपूरला SBL कंपनीत भीषण स्फोट; १७ ठार, १८ जण जखमी; दारुगोळा तयार करताना सकाळी घडली घटना

‘एसबीएल’च्या विविध युनिटमध्ये ३५ हून अधिक कर्मचारी काम करत होते. या स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. स्फोटात मृतदेह ओळखू येणार नाही इतके जळाल्याने मृतांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांचे डीएनए नमुने घेण्यात येत आहेत.

Swapnil S

नागपूर : नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’ (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी भयंकर स्फोट झाला आहे. त्यात १७ कामगार ठार झाले असून, १८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’ या खाण व औद्योगिक स्फोटके निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या कारखान्यात हा स्फोट झाला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

राऊळगावलगतच्या येनवरा गावात एसबीएल एनर्जीचा हा प्रकल्प आहे. या ठिकाणी डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स, सिजमिक एक्सप्लोसिव्ह्सचे उत्पादन होते. ‘एसबीएल’च्या विविध युनिटमध्ये ३५ हून अधिक कर्मचारी काम करत होते. या स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. स्फोटात मृतदेह ओळखू येणार नाही इतके जळाल्याने मृतांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांचे डीएनए नमुने घेण्यात येत आहेत. तर जखमींना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या या कारखान्याबाहेर मृतांच्या नातेवाईकांची गर्दी उसळली असून, आपल्या प्रियजनांबाबत माहिती मिळावी यासाठी ते व्याकुळ झाले होते.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांच्या पथकांसह पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्हज‌् सेफ्टी ऑर्गनायझेशन आणि डिफेन्स इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर सिक्युरिटीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. कंपनीने अंतर्गत चौकशी सुरू केली असून तपासाच्या निष्कर्षानुसार योग्य दुरुस्ती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. प्रभावित कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत करणे ही आमची प्राथमिकता असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने तत्काळ आर्थिक मदत देण्यात येत असून जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च कंपनी उचलणार आहे. आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली तत्काळ कार्यान्वित करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

या भीषण स्फोटामुळे राऊळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्रामस्थ घटनास्थळी जमले होते. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. घटनेमुळे काटोल तालुका हादरला असून स्फोटक कारखान्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी झालेल्या स्फोटानंतर ही घटना घडली आहे. आंध्रमधील त्या घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला होता.

जखमींना उपचारासाठी नागपूरला हलवले

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्फोटानंतर लागलेली आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलीस, स्थानिक प्रशासन व कंपनीच्या बचाव पथकाने घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. या स्फोटात जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून स्फोटाच्या कारणांचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे. आपण स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

स्फोटाचे नेमके कारण अस्पष्ट

कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, सकाळी ७ ते ७.१५ या वेळेत कंपनीच्या डिटोनेटर पॅकिंग युनिटमध्ये हा स्फोट झाला. स्फोट पॅकिंग विभागात झाला. त्यावेळी कोणतीही सक्रिय उत्पादन प्रक्रिया सुरू नव्हती. नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होईल. आम्ही संबंधित यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना दु:ख

नागपूर स्फोटात मृत्यू पावलेल्या कामगारांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या निकटवर्तीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून दोन लाख रुपये व जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू; अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात मुलगी-जावई, सून-नातही ठार; खामेनींच्या मृत्यूचा बदला घेणार - इराण

ध्रुवीकरणाच्या राजकारणात हरवत चाललेले बंधुत्व

Holi 2026: यंदा होलिका दहनाचा मुहूर्त अवघा १२ मिनिटांचा; २ की ३ मार्च? जाणून घ्या नेमकी तारीख अन् अचूक वेळ

मार्च महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, २ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत