नांदेड : तेलंगणातून नांदेडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने भोकरकडे येणाऱ्या खासगी टाटा मॅजिकला गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जोरदार समोरासमोर धडक दिली. हा भीषण अपघात भोकर-नांदेड मार्गावरील वाकद शिवारातील सीताखंडी घाटाजवळ घडला. या दुर्घटनेत मॅजिकमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील ट्रक भरधाव वेगाने नांदेडच्या दिशेने जात होता. वाकद शिवारातील वळणावर समोरून येणाऱ्या खासगी टाटा मॅजिकला ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मॅजिकमधील सहा प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये लक्ष्मीबाई पांडुरंग वाघमारे, पांडुरंग लिगोंजी वाघमारे, शेख फेरोज, बलवान पवार (४०), अलमास अलीमोदिन सगर आणि शायद सौदागर यांचा समावेश आहे. या अपघातात ट्रक चालक बासुमिया राजुमिया तसेच शेख खलील शेख वहीद (३१) आणि सोमनाथ मारोती यळणे (३०) यांच्यासह अन्य जण जखमी झाले आहेत. जखमींवर भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
नांदेड-भोकर महामार्गावरील वाकद गावाजवळ, सीताखंडी येथे भरधाव ट्रक आणि टाटा मॅजिक व्हॅनची भीषण धडक होऊन झालेल्या दुर्घटनेबद्दल खासदार अशोक चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतील जखमींना तातडीने आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला दिले आहेत.