महाराष्ट्र

नांदेडमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून ७ शेतमजूर महिलांचा मृत्यू, ३ जखमी

नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे शुक्रवारी सकाळी महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या भीषण दुर्घटनेत ७ शेतमजूर महिलांचा मृत्यू झाला, तर ३ शेतमजूर जखमी झाले आहेत.

Swapnil S

भास्कर जामकर/नांदेड

नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे शुक्रवारी सकाळी महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या भीषण दुर्घटनेत ७ शेतमजूर महिलांचा मृत्यू झाला, तर ३ शेतमजूर जखमी झाले आहेत.

वसमत तालुक्यातील गुंज या गावातील १० शेतमजूर नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात भुईमूग निंदनीच्या कामासाठी ट्रॅक्टरने जात होते. दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतातील कठडा नसलेल्या विहिरीत ट्रॅक्टर ट्रॉली शुक्रवारी सकाळी पडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

या दुर्घटनेत पार्वतीबाई रामा भुरड, पुरभाबाई संतोष कांबळे, सटवाजी जाधव हे शेतमजूर बचावले, तर ताराबाई सटवाजी जाधव (३५), धुरपता सटवाजी जाधव (१८), सिमरन संतोष कांबळे (१८), सरस्वती लखन भुरड (२५), चऊत्राबाई माधव पारधे (४५), सपना/मिना राजू राऊत (२५), ज्योती इरबाजी सरोदे (३०) या महिलांचा अपघातात मृत्यू झाला.

यावेळी पोलीस प्रशासन व नांदेड वाघाळा मनपाचे शोध व बचाव पथक, स्थानिक कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने शोध व बचावकार्य करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला व तातडीच्या मदतीची घोषणा केली. या अपघातासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

आजच्या अपघातामध्ये सात निष्पाप जीवांचे बळी गेल्यामुळे अशा अपघातप्रवण किती विहिरी नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांचा शोध घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून २ व ५ लाखांची मदत जाहीर

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मदतनिधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे.

वीजचोरांवर AI चा 'सर्जिकल स्ट्राईक'; तीन महिन्यांत २८ हजार वीजचोरीचा पर्दाफाश, २८९ प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल

Mira-Bhayandar : उत्तन-पाली डम्पिंगला हरित लवादाचा दणका; तीन महिन्यांत ९.०९ लाख मेट्रिक टन कचरा हटवा

नांदेड-भोकर महामार्गावर भीषण अपघात; सहा ठार, दहा जण जखमी; भोकर व नांदेड येथे उपचार सुरू

Sindhudurg : पक्षाच्या प्रतिमेला ‘गालबोट’ लावणाऱ्यांची गय नाही! नितेश राणेंचा कार्यकर्त्यांना इशारा

Thane : रखडलेले SRA प्रकल्प आता रडारवर; अकार्यक्षम विकासकांना हटविण्याचे संकेत