हारून शेख / लासलगाव
थंडीची चाहूल लागताच महाराष्ट्राचे ‘भरतपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामसर दर्जा प्राप्त नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून, आतापर्यंत १०० हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांनी अभयारण्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे अभयारण्यात पक्ष्यांचा अविरत किलबिलाट सुरू झाला आहे.
वनविभागाने पर्यटकांसाठी कायाकिंग बोटींची सुविधा उपलब्ध करून दिल्याने आता पाण्यातून पक्ष्यांचे जवळून निरीक्षण करण्याची आणि सुंदर छायाचित्रांचे टिपण करण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
थंडीचे आगमन यंदा काहीसे उशिरा झाल्याने स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्कामही उशिराने सुरू झाला. थंडीचा जोर वाढू लागल्याने युरोप, मंगोलिया, सायबेरिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, अमेरिका, दक्षिण आशियातील विविध प्रदेशाiतून आलेल्या पक्ष्यांनी अभयारण्य तुडूंब गजबजू लागले असून सुमारे ३२ हजाराहून अधिक पक्ष्यांची नोंद झाली आहे.
कलहंस, शेंडी बदक, बेलन्सची फटाकडी मोहविते
सध्या अभयारण्यात फ्लेमिंगोसह मोठी लालसरी, तिबेटी चिखल्या, कॅंटिश चिखल्या, राजहंस (पट्टेदार हंस), कलहंस, शेंडी बदक, छोटी लालसरी, दलदली भोवत्या, युरेशियन कोरल, कैकर (ऑस्प्रे), मोठ्या ठिपक्यांचा गरुड, सामान्य टिलवा, नीलकंठी गप्पीदास, हिरव्या पंखांचे चक्रांग बदक, सामान्य पाणलवा, पिवळा धोबी, युरेशियन वळणमान्या, कलकलाटी तृणगायिका, भातशेतीची तृणगायिका, बेलन्सची फटाकडी, लालसर छातीची फटाकडी, ससुमार गरुड, पांढरा करकोचा, हळद्या, सामान्य धीवर, पिवळ्या पायाची हरळी, कोतवाल, लांब शेपटीचा खाटीक, पाठीवर तपकिरी रंगाचा खाटीक, तिरंदाज, ढोकरी आणि तांबट आदी पक्षी आढळून येत आहे.
पाणथळ प्रदेश, मुबलक खाद्यामुळे पक्षी आकर्षित
पाणथळ प्रदेश, मुबलक खाद्य आणि पोषक नैसर्गिक अधिवास यामुळे नांदूरमध्यमेश्वर हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. विविध रंग, आकार आणि वैशिष्ट्ये असलेल्या पक्ष्यांच्या आगमनाने अभयारण्यातील जैवविविधता अधिक खुलली आहे.
कायाकिंगमुळे पक्षी निरीक्षणाचा नवा अनुभव
अभयारण्यात वनविभागाच्या वतीने कायाकिंग बोटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बोटीद्वारे पाणथळ भागात फिरताना पक्ष्यांचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जवळून निरीक्षण करता येणार आहे. विशेषतः पक्ष्यांचे बारकावे टिपण्यासाठी आणि छायाचित्रणासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षित गाईड सोबत असल्याने विविध पक्ष्यांच्या प्रजाती, त्यांची वैशिष्ट्ये आणि अधिवास यांची माहितीही पर्यटकांना मिळणार आहे. अत्यंत माफक दरात ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना केवळ पक्षी पाहण्याऐवजी पाण्यातून निसर्गाचा वेगळाच अनुभव घेता येणार आहे.
पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा...
थंडीचे प्रमाण जसजसे वाढेल तस तशी नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देशी आणि विदेशी पक्ष्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही महिने स्थलांतरित पक्ष्यांचा अभयारण्यात मुक्काम राहणार आहे. पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी वाढत आहे. पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे.हिरालाल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य