मुंबई : उद्धव आणि राज ठाकरे यांचे राजकारण संपले असून आणि त्यांचे एकत्र येणे अप्रासंगिक असल्याची टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली.
राणे म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले 'मतचोरी'चे आरोप निवडणुकीच्या निकालावर काही परिणाम करणार नाहीत. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतात की नाही, यात मला रस नाही. त्यांचे राजकारण संपले आहे, असे राणे यांनी पत्रकारांना सांगितले.
गणेशोत्सवात उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी जाणार असल्याच्या चर्चेवर राणे म्हणाले, एक माणूस दुसऱ्याच्या घरी गेला, तर त्यात काय फरक पडतो? त्याला काही महत्त्व नाही. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उद्धव-राज युतीच्या चर्चेला उधाण आलेले असले तरी औपचारिक घोषणा झालेली नाही.
राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर राणे म्हणाले, राहुल गांधी किंवा उद्धव ठाकरे काय बोलतात, त्याला काही अर्थ नाही. त्याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार नाही. राणे यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-सिंधुदुर्गदरम्यानच्या खड्डेमय रस्त्याच्या कामांची पूर्तता होईल, असे आश्वासन दिले आहे.
मी पुन्हा त्यांच्याशी बोलणार आहे आणि काम पूर्ण होण्याच्या वेळापत्रकाबद्दल विचारणार आहे. रस्ते चांगल्या दर्जाचे होतील की नाही, हेही विचारेन आणि त्याबाबत माध्यमांना माहिती देईन, असे राणे म्हणाले.