पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

कविवर्य नारायण सुर्वेंचे वैभववाडीत भव्य स्मारक; पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर

पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांचे भव्य स्मारक वैभववाडी तालुक्यातील हेत येथे उभारण्यात येणार असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Swapnil S

सिंधुदुर्ग : पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांचे भव्य स्मारक वैभववाडी तालुक्यातील हेत येथे उभारण्यात येणार असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी हा निधी मंजूर केला असून, माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून हे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य भालचंद्र साठे यांनी दिली.

हेत येथे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, सरपंच कांचन कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना साठे यांनी सांगितले की, खासदार नारायण राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. वैभववाडी तालुक्यात एडगाव येथे त्यांनी स्वखर्चातून शहीद विजय साळसकर स्मारक उभारले आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तालुक्यात महाराणा प्रतापसिंह कलादालन उभारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता नारायण सुर्वे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.

हेत गावातील मुख्य रस्त्यालगत उभारण्यात येणाऱ्या स्मारकात सुसज्ज सभागृह, वाचनालय आणि सुर्वे यांचा पूर्णाकृती पुतळा असेल. तसेच त्यांच्या जीवनकार्यावरील माहितीपट, साहित्य आणि कविता संग्रह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कामगार कवी नारायण सुर्वे यांच्या विचारांचा वारसा आणि त्यांचे साहित्य जतन करण्यासाठी येथे विविध साहित्यिक उपक्रम राबवले जाणार आहेत.

विद्यार्थी, साहित्यिक आणि साहित्यप्रेमींसाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल. नारायण सुर्वे यांच्या साहित्यिक वारशाचे जतन आणि त्यांच्या साहित्याचा प्रसार करण्यासाठी स्मारकाचा उपयोग होईल, असा विश्वास साठे यांनी व्यक्त केला. निधी मंजूर केल्याबद्दल हेतवासीयांसह तालुक्यातील नागरिकांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांचे आभार मानले.

दरम्यान, मुंबईजवळील नेरळ येथे नारायण सुर्वे यांनी वास्तव्य केलेले घर यापूर्वीच स्मारकात रूपांतरित करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सत्ताधारी महायुतीत बंडखोरीची चिन्हे; विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवार जाहीर

सोयाबीनच्या उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांची घट; शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग आर्थिक संकटात

डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार! एल निनोची तीव्रता वाढणार, सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

Mumbai : गेमचा आयडी वापरला म्हणून चाकूहल्ला; तरुण गंभीर जखमी