लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर वाहतूक करून विक्री करण्यास बंदी घातली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार हिरवा चारा, कडबा, कुट्टी, पेंढा, टीएमआर (एकूण मिश्रित पशुखाद्य) तसेच इतर प्रकारच्या पशुखाद्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक आणि विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाची अधिकृत मंजुरी असलेल्या चारा वाहतुकीला यातून वगळण्यात आले आहे.
राज्य शासनाने नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ दुष्काळ जाहीर केला आहे. जिल्ह्यातील चारा इतर जिल्ह्यांत आणि सीमावर्ती भागांत विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. चाऱ्याची टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीविताला धोका पोहोचू नये, हा त्यामागील उद्देश आहे.
हा आदेश १३ ऑक्टोबर २०२६ पासून १० डिसेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेश होईपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.
चारा उत्पादन आणि साठवणुकीवर भर
जिल्ह्यातील पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्यासाठी जून २०२७ पर्यंतचा कृती आराखडा तयार केला. जिल्ह्यात १८ लाखांहून अधिक पशुधन असून, त्यासाठी दरमहा सुमारे दोन लाख सात हजार ३९३ टन चाऱ्याची आवश्यकता आहे. उपलब्ध चारा ५३ हजार ९७७ टन असून, तो १२७ दिवस पुरू शकतो. संभाव्य टंचाई टाळण्यासाठी १७ हजार १६० लाभार्थ्यांना चारा बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. चारा उत्पादन वाढविणे, साठवणूक, चारा बँकांची निर्मिती आणि मुरघास उत्पादनावर भर देण्यात येणार आहे.