Nashik : कुंभमेळ्यामुळे ५० हजार कोटींच्या व्यापाराची संधी; एक लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

Nashik : कुंभमेळ्यामुळे ५० हजार कोटींच्या व्यापाराची संधी; एक लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज

गोदावरी नदीच्या तीरावर १२ वर्षांनंतर होणारा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याची मोठी संधी आहे, असे मत अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) व्यक्त केले आहे.

Swapnil S

मुंबई : गोदावरी नदीच्या तीरावर १२ वर्षांनंतर होणारा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याची मोठी संधी आहे, असे मत अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) व्यक्त केले आहे.

‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि स्वदेशी व्यापारी मंचाचे राष्ट्रीय संयोजक बालकृष्ण भरतिया यांनी सांगितले की, कुंभमेळ्यामुळे नाशिक हे देशातील सर्वांत मोठ्या तात्पुरत्या आर्थिक उलाढालीच्या केंद्रांपैकी एक बनेल.

‘कॅट’च्या नागपूर विभागाने आयोजित केलेल्या धर्माधारित अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेवर बोलताना भरतिया यांनी या सोहळ्यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात ५० हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापाराच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला.

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई), आतिथ्य क्षेत्र तसेच वाहतूक सेवांना याचा मोठा लाभ होईल, असे कॅटने म्हटले आहे. कुंभमेळ्यासाठी दोन कोटींहून अधिक भाविक येण्याची अपेक्षा असल्याने हॉटेल व्यावसायिक, रिक्षाचालक, मंडप व्यावसायिक आणि स्टॉलधारकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता आणि डिजिटल सेवांसारख्या क्षेत्रांत स्थानिक तरुणांसाठी एक लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध होतील, असा अंदाज भरतिया यांनी व्यक्त केला.

कुंभमेळ्याच्या काळात अंथरूण, गाद्या, चादरी आणि उशा यांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादक आणि व्यापाऱ्यांसाठी व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतील, असे कॅटने स्पष्ट केले.

भरतिया म्हणाले की, चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात जत्रा आणि तीर्थक्षेत्रे ही भारतातील व्यापाराची महत्त्वाची केंद्रे होती. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, तीर्थक्षेत्रे, जत्रा आणि उत्सव हे योगक्षेम अर्थात व्यापार, रोजगार आणि आर्थिक कल्याणाचा पाया होते. याच प्राचीन आर्थिक प्रारूपाच्या माध्यमातून आगामी कुंभमेळ्याची आर्थिक क्षमता अधोरेखित करण्याचा प्रयत्न कॅट आणि स्वदेशी व्यापारी मंच करीत आहेत.

या धार्मिक सोहळ्यातून निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधींबाबत स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दोन्ही संघटनांचे प्रतिनिधी नाशिक आणि परिसरात दौरे करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोदावरी खोऱ्यातील शेतकऱ्यांना फुले, फळे, भाजीपाला, सॅलडसाठी लागणारा कच्चा माल, मका आणि शेंगदाणे यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने त्यांचा मोठा फायदा होईल.

देशभरातून तसेच परदेशातून येणाऱ्या भाविकांमुळे पैठणी साड्या, त्र्यंबकेश्वरमधील रुद्राक्ष माळा, तांब्या-पितळेची भांडी आणि धार्मिक वस्तूंच्या व्यापारालाही चालना मिळेल.

स्थानिक व्यापाऱ्यांसाठी नाशिकची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी नमूद केले. नाशिकची द्राक्षे, वाइन, पाव मिसळ आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रसिद्धी मिळू शकते. मौर्यकालीन भारतात मसाले आणि मलमलीचे कापड आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचत होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.

स्थानिक उत्पादकांना लाभ मिळावा

कुंभमेळ्याच्या निमित्ताने स्थानिक उत्पादकांना लाभ मिळावा आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडेच आर्थिक लाभ केंद्रित होऊ नये, यासाठी राज्य सरकारने 'एक जिल्हा, एक उत्पादन' आणि 'व्होकल फॉर लोकल' उपक्रम राबवावा.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तिकीट दरांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सरकारला अधिकार; प्रवासी भाड्याबाबत नवे नियम जाहीर

Mumbai : शिक्षक मारहाण प्रकरण; अखेर १० वर्षांनी महापौर रितू तावडे न्यायालयात हजर

Gold Rate Hike : दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत वाढ; चांदी स्थिर

Mumbai : ११०० कोटींच्या थकबाकीमुळे महालॅब, डायलिसिस केंद्रांना टाळे

दिवाळीत पाणी कपात स्थगित; ठाणेकरांना किंचित दिलासा; स्टेमपाठोपाठ MIDC चा निर्णय