महाराष्ट्र

'साधूंच्या नावाने जमीन सपाट करायची, नंतर लाडक्या उद्योगपतीला...'; नाशिक कुंभसाठीच्या वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत." असे म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र डागले.

किशोरी घायवट-उबाळे

२०२७ मध्ये  नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू झाली असून या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात ११५० एकरांवर साधुग्राम उभारणार आहेत. तब्बल १८०० झाडांची कत्तल केली जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी यावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या वृक्षतोडीला विरोध करत सरकारवर निशाणा साधला. "साधूंच्या नावाने जमीन सपाट करायची आणि आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची" असे म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि.२९) सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने घेतलेल्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे.

कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत?

राज ठाकरे म्हणाले, "आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने १८०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

सरकारकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग...

पुढे ते म्हणाले, "बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत." असे म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र डागले.

जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून...

राज ठाकरे पुढे म्हणाले, "आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची! इतकाच विचार या सरकारचा असणार! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार, त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत!" असे म्हणत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.

तुम्ही ठाम रहा, मनसे तुमच्या पाठीशी

पुढे ते म्हणाले, "नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की, तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही, या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील!" असे म्हणत राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर..

यासोबतच, राज ठाकरे म्हणाले की, "माझं सरकारला आवाहन आहे की, उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा. तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच!" असा इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला.

Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

विमान तिकिटे महागणार! Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही इंधन अधिभार; वाचा सविस्तर

देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही; घाबरून इंधन साठवू नका, केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन

पुण्यात धक्कादायक घटना; लिफ्टच्या दरवाज्यात अडकला चिमुकलीचा हात, CCTV व्हिडिओ व्हायरल