Nashik : निफाडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी; शेतकऱ्यांनी बिबट्याला जिवंत पकडले 
महाराष्ट्र

Nashik : निफाडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी; शेतकऱ्यांनी बिबट्याला जिवंत पकडले

निफाड तालुक्यात सोमवारी टाकळी (विंचूर) येथील काळे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले, तर खडक माळेगाव येथील शिंदे वस्तीवर शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत एका बिबट्याला जिवंत पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले.

Swapnil S

लासलगाव : निफाड तालुक्यात सोमवारी टाकळी (विंचूर) येथील काळे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले, तर खडक माळेगाव येथील शिंदे वस्तीवर शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत एका बिबट्याला जिवंत पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले.

खडक माळेगाव येथील शिंदे वस्तीवर रविवारी सकाळी रामेश्वर शिंदे यांच्या घराजवळ दोन बिबटे मुक्त संचार करत होते. शिंदे यांनी तत्काळ परिसरातील शेतकऱ्यांना सतर्क केले. ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही बिबट्यांना हुसकावून लावले. मात्र काही वेळाने एक बिबट्या पुन्हा घराजवळ येऊन बसला. शेतकऱ्यांनी धाडस दाखवत कांदा साठवणीसाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी जाळीच्या सहाय्याने बिबट्याला बंदिस्त केले. त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली.

वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नाशिक येथील ट्रँक्विलायझर (टीटीसी) पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने बिबट्याला बेशुद्ध केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्याने प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे तातडीने हलविण्यात आले.

दरम्यान, तर निसटलेला दुसरा बिबट्या टाकळी (विंचूर) येथील काळे वस्ती परिसरात पोहोचला. द्राक्षबागेत दबा धरून बसलेल्या या बिबट्याने प्रकाश बबन काळे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीम सुरू असताना बिबट्याने वन विभागाचे मदतनीस कर्मचारी सादिक भय्या शेख यांच्यावरही हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.

ओवी थोडक्यात बचावली

दीड वर्षांची ओवी ही झोळीत झोपली असताना बिबट्या तिच्या जवळ उभा राहिला. ही बाब पूजा शिंदे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ ओवीच्या आईला फोन करून माहिती दिली. अशा वेळी सिंधुबाई बाहेर आल्या असता त्यांचे बिबट्याकडे लक्ष गेले. त्यांनी जोरदार आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला आणि गवतामध्ये जाऊन लपला.

राज्य ‘रेल्वे फाटकमुक्त’ करण्याचा संकल्प; 'महारेल'च्या ६५ प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Weather Update : मान्सून दोन दिवसांत मुंबईत

तरुणाची अटल सेतूवरून आत्महत्या; उलवे पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

कशेडी घाटामध्ये डंपरच्या पाठीमागे कार घुसली; आई गंभीर जखमी

Mumbai : शीतल तेजवानीला हायकोर्टाचा दिलासा; अखेर सशर्त जामीन मंजूर