महाराष्ट्र

नाशिक-त्र्यंबक रस्त्याचा निर्णय ‘मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात’; सहमतीने निर्णय घेण्याचे जलसंपदा मंत्री यांचे आश्वासन

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमध्ये रस्ते विकास हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्र्यंबकेश्वरला मोठ्या प्रमाणावर भाविकांची ये-जा होत असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.

Swapnil S

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमध्ये रस्ते विकास हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्र्यंबकेश्वरला मोठ्या प्रमाणावर भाविकांची ये-जा होत असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मागण्या विचारात घेत सहमतीने निर्णय घेतला जाईल आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

मंत्री महाजन यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी केली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, तानाजी जायभावे, प्रा. भाकर खराटे, कैलास खांडबहाले, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा आणि त्र्यंबकेश्वर नगरपरिषद अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांशी संवाद साधताना मंत्री महाजन म्हणाले, रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत सर्वानुमते निर्णय घेतला जाईल.

नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशी शासनाची भूमिका आहे. यावेळी रस्त्याची मोजणी तसेच रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या क्षेत्राची पाहणीही करण्यात आली. मुंबईत पोहोचताच या मुद्द्याची सविस्तर माहिती मुख्यमंत्री महोदयांना देणार असून त्यानंतर ते योग्य निर्णय जाहीर करतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीही थेट उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या चिंता जाणून घेतल्या.

मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवर चर्चा

पाहणीदरम्यान मंत्री महाजन यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवर संवाद साधला. नाशिक-त्र्यंबक रस्त्याबाबत नागरिकांच्या मागण्यांची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. रस्ता रुंदीकरण करताना नागरिकांच्या भावना जपल्या जातील, ही मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

देशभरातील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवा; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

Thane : पालिका निवडणुकीची सूत्रे आमदार संजय केळकरांकडे; ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव वाढणार

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ! तिसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३८७ जागा रिक्त