महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना पहिलीपासून 'एनसीसी' धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस; शिस्त, देशप्रेम ही उद्दिष्ट्ये : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे

मंत्रालयात झालेल्या बैठकीत एनसीसीचा राज्यातील विस्तार, प्रशिक्षणाचे स्वरुप, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आदींबाबत चर्चा करण्यात आली.

Krantee V. Kale

मुंबई / नाशिक : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यादृष्टीने त्यांनी एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

मुलांना पहिलीपासून सैनिकी शिक्षण अथवा एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस मंत्री भुसे यांनी जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत एनसीसीचा राज्यातील विस्तार, प्रशिक्षणाचे स्वरुप, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आदींबाबत चर्चा करण्यात आली.

भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये देशाविषयी आदर निर्माण होण्याच्या दृष्टीने यावर्षी स्वातंत्र्यदिन समारंभात देशभक्तीपर गीतांवर कवायती सादर केल्या जाणार आहेत. राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना एनसीसीचे प्रशिक्षण मिळावे याअनुषंगाने राज्यातील एनसीसीची प्रशिक्षण केंद्र वाढवून मिळावीत तसेच अधिक शाळांमधील विद्यार्थी त्यात सहभागी व्हावेत, यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिक कल्याण मंडळाच्या मदतीने माजी सैनिकांची देखील मदत घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

२० हजार विद्यार्थी जोडणार

एनसीसीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी राज्यातील एनसीसीची केंद्रे, प्रशिक्षकांची संख्या, प्रशिक्षणाचे स्वरुप आदींची माहिती दिली. सध्या राज्यात सात ग्रुप्स आणि ६३ युनिट्स असून यात १,७२६ शाळा, महाविद्यालयांतील एक लाख १४ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत असल्याचे सांगितले. लवकरच यातील १० केंद्रांचा विस्तार होऊन यात अधिकचे २०,३१४ विद्यार्थी जोडले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात शासनाकडून एनसीसीला चांगले सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

Satara : पोलीस उपनिरीक्षकाच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या; हातावर लिहिली सुसाइड नोट

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

प्रेमभंग झाल्याने भररस्त्यात प्रेयसीवर चाकूहल्ला; प्रियकराची आत्महत्या; काळाचौकी येथील घटना

भारत बंदुकीच्या धाकावर व्यापार करार करत नाही; व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले

पँगाँग सरोवराजवळ चीन उभारतोय हवाई सुरक्षा संकुल; चीनचे कटकारस्थान उघड