नागपूरमधील एनआयटी घोटाळा प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भष्ट्राचार केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच, यासंदर्भातील पीआयएल ही सर्वात आधी भाजपच्या नेत्यांनी दाखल केली होती, असा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी पत्रकारांची बोलताना अजित पवार म्हणाले की, "गेल्या ६ महिन्यांपासून सत्ताधाऱ्यांची मुजोरी सुरु आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षाच्या तक्रारींना वेळ दिला जातो, तर दुसरीकडे विरोधकांच्या तक्रारी दाबल्या जातात." अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लावलेल्या आरोपांबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, " ८३ कोटींची भूखंड २ कोटीला दिला. याबद्दल सगळं वातावरण तापले आहे. भूखंडाचे श्रीखंड वगैरे आरोप केले जात आहेत. पण हे प्रकरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपनेच बाहेर काढले होते. त्यांच्यामधील काही लोकांनी याबद्दल पीआयएल दाखल केली होती." असा गौप्यस्फोट त्यांनी केली. याआधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील हाच आरोप केला होता. ते म्हणाले होते की, "दीड महिन्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आणि नागोराव गाणार या विदर्भातल्या आमदारांनीच या विषयावर तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तोच विषय़ आम्ही घेतला. याचा अर्थ हे प्रकरण समोर यावे अशी भाजपच्याच लोकांची इच्छा आहे." असा दावा त्यांनी केला होता.