मुंबई : आरक्षणाबाबत सरकारने बोलावलेल्या बैठकीसंदर्भात बारामतीमधून कुणाचा तरी फोन आल्याने विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला, अशा शब्दांत ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेची शाई वाळण्याआधीच भुजबळ यांनी बॅकफूटवर जात दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन अचानक भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत.
ओबीसी-मराठा मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची भुजबळांची पवारांना गळ
या भेटीविषयी शरद पवार यांनी कोणतेही भाष्य केलेले नसले तरी ओबीसी-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याचे छगन भुजबळ यांनी स्वत:हून सांगितले आहे. तब्बल दीड तास वाट बघितल्यानंतर भुजबळ-पवार यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दिवसभर रंगली होती. दरम्यान, आपले राजकीय अस्तित्व संपण्याची भीती वाटू लागल्यानेच महायुतीत अस्वस्थ असलेल्या भुजबळ यांनी पवार यांची भेट घेतली असावी, असा एक मतप्रवाह आहे. सध्याच्या वातावरणात शरद पवार यांची नाराजी ओढवून घेणे राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही याची जाणीव झाल्यानेच ते शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भुजबळ यांनी भले पवार यांची भेट घेतली असली तरी त्यांचे परतीचे दोर कापून टाकण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात बोलले जात आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या पक्षाला रामराम केल्यानंतर प्रथमच भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला गेले. भुजबळ यांनी कुठलीही आगाऊ सूचना न देता पवार यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तथापि, ही राजकीय भेट नसून मराठा व ओबीसी समाजाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण बिघडले. त्यावर शरद पवार यांनी मध्यस्थी करावी यासाठी पवार यांची भेट घेतल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
...तरी दीड तास चर्चा
पवार यांची भेट घेण्याआधी वेळ घेतली नव्हती. पवार ‘सिल्व्हर ओक’वर असल्याचे समजल्याने थेट भेट घेण्यासाठी गेलो. मात्र, त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आराम करत होते. त्यामुळे मला काही वेळ वाट बघत थांबावे लागले. परंतु पवार यांना समजल्यावर त्यांनी बोलावले आणि जवळपास दीड तास चर्चा झाल्याचे भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दोघेही तरबेज नेते
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यावर म्हणाले की, शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोन्ही पोहचलेले नेते आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये जी काही चर्चा होते, ती ते जगाला सांगत नाहीत.
भुजबळांमुळेच महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती - जरांगे
छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली तर काय झाले. मुळात भुजबळ हा बेईमान माणूस आहे. भुजबळांना महाराष्ट्रातील स्फोटक परिस्थितीवर बोलण्याचा अधिकार नाही. कारण स्फोटक स्थिती निर्माण करण्याची भाषा ही भुजबळांनीच केलेली आहे. दोन-चार ओबीसींचे नेते हाताशी धरून मराठा समाजाविरोधात वादग्रस्त विधान करायला लावायचे, हा त्यांचा धंदा बनला आहे, असा आरोप करीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी भुजबळांवर तोफ डागली.