राष्ट्रवादीतील वाद! पडदा टाकण्याचा पार्थ यांचा प्रयत्न; तर पटेलांबाबत सुनेत्रा यांची ‘गुगली’ 
महाराष्ट्र

राष्ट्रवादीतील वाद! पडदा टाकण्याचा पार्थ यांचा प्रयत्न; तर पटेलांबाबत सुनेत्रा यांची ‘गुगली’

राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित वादंगावर पडदा टाकण्याचे प्रयत्न खासदार पार्थ पवार यांनी सुरू केल्याचे दिसते.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित वादंगावर पडदा टाकण्याचे प्रयत्न खासदार पार्थ पवार यांनी सुरू केल्याचे दिसते. खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबद्दलच्या येणाऱ्‍या बातम्या निराधार आणि तर्कवितर्क हे निव्वळ काल्पनिक आहेत, असा खुलासा पार्थ पवार यांनी गुरुवारी केला. पटेल आणि तटकरे यांची दशकांहून अधिक काळाची निष्ठा आणि नेतृत्व आपल्या सर्वांना नेहमीच दिशा देत आले आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना मुद्दामहून ओढूनताणून निर्माण केलेल्या वादात गोवणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.

निराधार बातम्या आणि केवळ तर्क-वितर्कांवर आधारित कथनाद्वारे  पटेल आणि तटकरे यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांचे अनेक दशकांचे योगदान आणि नेतृत्व आजही आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत आहे. अशा वरिष्ठ नेत्यांना वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असून याचा ठामपणे निषेध केला पाहिजे, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे.

पक्षाच्या राष्ट्र्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी भारत निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर त्यांच्या पदाचा उल्लेख नाही. हा तपशील खरा की खोटा याबाबत मात्र पार्थ यांनी स्पष्ट खुलासा केलेला नाही.

दरम्यान, पार्थ यांचा हा खुलासा येत असतानाच तिकडे दिल्लीत एक छोटे नाट्य घडले. एरवी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते दिल्लीत आले की प्रफुल्ल पटेल हमखास त्यांच्यासोबत असतात. गुरुवारी राज्यसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उपस्थित राहण्यासाठी खासदार असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत आल्या होत्या. मात्र त्यांच्यासोबत पटेल नव्हते. त्यावेळी पत्रकारांनी प्रफुल पटेल कुठे आहेत अशी प्रतिक्रिया दिली. सध्या राष्ट्रवादीत चालू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या उत्तराचे वेगवेगळे अर्थ लावले जाऊ लागले.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सर्वप्रथम या वादाला तोंड फोडले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या अठरा दिवसांत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. या पत्राद्वारे त्यांनी पक्षाच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना सर्व अधिकार देण्याची मागणी केली होती, असा दावा रोहित पवार यांनी केला होता. हे पत्र लिहिताना अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, पत्नी सुनेत्रा पवार (ज्यांची नियुक्ती नंतर उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून झाली) किंवा पक्षाच्या इतर आमदारांना विश्वासात घेतले गेले नव्हते. जेव्हा सुनेत्रा पवार यांना या पत्राबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्यांनीही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. २८ जानेवारी २०२६ पासून सुनेत्रा यांची निवड झाली तोवर म्हणजे २६ फेब्रुवारीपर्यंत पक्षाच्या वतीने झालेला कोणताही पत्रव्यवहार अधिकृत ग्राह्य मानला जाऊ नये, असे त्यात म्हटले होते. या पत्रात प्रफुल्ल पटेल व तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नव्हता अशाही बातम्या आल्या होत्या. त्याबाबतच पार्थ यांनी हा खुलासा केला आहे.

'खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार नोंदणी; ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण लवकरच लागू; पालिका सभागृहाची मंजुरी

Ulhasnagar: घरे-दुकानांवरील 'रुंदीकरणाची टांगती तलवार' दूर होणार; ३६ ऐवजी २४ मीटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

माथेरानमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक; दररोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोळंबीसह ओल्या बोंबीलची आवक वाढली; मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी; खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

आता जिल्हा रुग्णालयापर्यंत 'मानकांनुसार आरोग्यसेवा'; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा निर्णय