मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खासदार पार्थ पवार यांच्या कार्यशैलीने नाराज असलेल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सोमवारी नवी दिल्लीत भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतली. पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना डावलून झालेल्या या अनपेक्षित भेटीने राष्ट्रवादीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीमुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी सोमवारी शहा यांची भेट घेतली. या भेटीचे छायाचित्र समोर आल्यानंतर राष्ट्रवादीबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. ही भेट म्हणजे दबावतंत्राचा भाग असल्याचे बोलले जात आहे. शिवाय या भेटीत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना वगळून राष्ट्रवादीच्या गटाच्या विलीनीकरणाबद्दल चाचपणी झाल्याचे सांगण्यात येते.
शरद पवार रुग्णालयात दाखल
दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोमवारी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. खोकल्याचा त्रास झाल्याने बाबांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमातून दिली. त्यांच्या वैद्यकीय तपासण्या सुरू असून, प्रकृतीशी संबंधित सर्व बाबी स्थिर असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.
आमदारांची उद्या तातडीची बैठक
अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संध्याकाळी उशिरा सुनेत्रा पवार यांची त्यांच्या 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नेत्यांनी शहा यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील सुनेत्रा पवार यांच्यासमोर ठेवल्याचे कळते. या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली असून बुधवारी संध्याकाळी सात वाजता 'देवगिरी' वर ही बैठक होईल.