मुंबई : पुण्यातील वैष्णवी हगवणे हिचा सासरी छळ होत असल्याने तिने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने राज्यभर हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या वादाच्या कात्रीत सापडल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनीही चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या लेखी पत्रात रोहिणी खडसे म्हणतात की, "महिला आयोगाने त्यावेळी तत्काळ दखल घेतली असती, तर आज वैष्णवी हगवणे जिवंत राहिली असती. त्यामुळे या प्रकरणात आयोगाची जबाबदारी निश्चितच आहे. चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर कार्यक्षमतेने काम करत नाहीत. रुपाली चाकणकर 'पार्टटाइम' पदाधिकाऱ्यासारखे काम करत आहेत. त्यामुळे महिलांना न्याय मिळत नाही. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या पदावरून हटवले जावे. महिला आयोगाकडे जवळपास ३२ हजार केसेस पेंडिंग आहेत. त्यामुळे आयोग महिलांना न्याय देण्यासाठी कमी पडत आहे. त्यामुळे पार्टटाइम महिला आयोगाच्या अध्यक्ष बदलून पूर्णवेळ अध्यक्ष महिला आयोगाला देण्यात यावा."
"पोलिसांनी या प्रकरणात किरकोळ कलमे लावली आहेत, त्यामुळे आरोपी सुटून जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच आम्ही अधिक गंभीर कलमे लावण्याची मागणी करत आहोत. तसेच, या प्रकरणात बार कौन्सिलने आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये, अशीही आमची विनंती आहे. या घटनेत जर एखादा पोलीस अधिकारी हगवणे कुटुंबीयांना धमकावत असेल, तर त्या अधिकाऱ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे," असेही त्यांनी म्हटले आहे.
नीलम गो-हे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्य महिला आयोगाने मयुरी जगतापची केस कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार कार्यवाही केली असती, तर आत्तापर्यंत मयुरीला तिच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता, असे मत गोहे यांनी व्यक्त केले.
महिला आयोगाचे सदस्य नेमले जावेत -गोन्हे
महिला आयोगाचे सदस्य लवकर नेमले जावेत. तसेच, बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांची मुदत संपली असून त्यांनाही लवकर नेमले जावे, अशी विनंती नीलम गो-हे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्या म्हणाल्या की, "राज्य महिला आयोगाचे काम बरोबर आहे की चूक, हे 'ट्रायल बाय मीडिया' किंवा 'ट्रायल बाय सोसायटी' पद्धतीने ठरू नये. मात्र, आयोग जे कार्य करत आहे, ते करताना त्यांनी काही तज्ञ लोकांकडून किंवा अनुभवी लोकांना विश्वासात घेतले पाहिजे."
चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनास्त्र
वैष्णवी हगवणेचा हुंडाबळी आणि पोलीस, महिला आयोगाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ तसेच आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'आप' सह बिटिया फाऊंडेशन आणि गुलाबो गैंगकडून शनिवारी आंदोलन करण्यात आले. चाकणकर यांनी विरोधकांना 'चिल्लर' संबोधल्याचा आरोप करत पुण्यातील गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे 'थिल्लर पे चिल्लर फेको' आंदोलन करण्यात आले.