मुंबई : माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलीनीकरणाचा विषय संपला, असे सांगून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी दोन्ही गटाच्या संभाव्य विलीनीकरणावर पडदा टाकला असला तरी दिल्लीत आज झालेल्या नेत्यांच्या भेटीगाठी व छगन भुजबळांच्या गौप्यस्फोटामुळे विलीनीकरणाचा विषय संपला नसल्याचे स्पष्ट झाले. विलीनीकरणानंतर एकसंध पक्षाचे नेतृत्व कुणाकडे यावर एकमत होत नसल्याने सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार एकाकी पडल्याचे चित्र आहे.
दिल्लीत भेटीगाठी
वित्त विभागाच्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीच्या निमित्ताने शुक्रवारी नवी दिल्लीत सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाचा विषय केंद्रस्थानी असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या भेटीतील चर्चेचा अधिकृत तपशील समजू शकला नाही. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही त्यानंतर पटेल यांची भेट घेतल्याने विलीनीकरणाच्या घडामोडीने वेग घेतल्याचे बोलले जाते.
आकडे जुळल्यानंतरच हिरवा कंदील
भाजपला संसदेत लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक मंजूर करायचे आहे. या विधेयकाला दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा मिळावा, असा भाजपचा प्रयत्न आहे. विधेयकाला समर्थन देणाऱ्या खासदारांचा आकडा जुळल्यानंतरच भाजपकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला हिरवा कंदील दाखवला जाईल. तोपर्यंत दोन्ही गटात चर्चेच्या फेऱ्या सुरू राहणार असल्याचे सूत्रांकडून समजते.