डॉ. नीलम गोऱ्हे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

नीलम गोऱ्हे गोत्यात; मविआ आक्रमक, अविश्वास प्रस्ताव दाखल

नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ‘मातोश्रीवर मर्सिडिज पोहोचल्या की पदे मिळतात,’ असे वक्तव्य करणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कोंडीत पकडण्यासाठी महाविकास आघाडीने पाऊल उचलले आहे.

Swapnil S

मुंबई : नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ‘मातोश्रीवर मर्सिडिज पोहोचल्या की पदे मिळतात,’ असे वक्तव्य करणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कोंडीत पकडण्यासाठी महाविकास आघाडीने पाऊल उचलले आहे. नीलम गोऱ्हेंविरोधात मविआ आक्रमक झाली असून विधिमंडळ सचिवांकडे अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. सभागृहाचा विश्वास गमावल्याने महाविकास आघाडीने गोऱ्हे यांच्याविरोधात हा निर्णय घेतला आहे.

नीलम गोऱ्हे यांना विधानपरिषद उपसभापती पदावरून हठवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांकडून विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधिमंडळ सचिवांकडे पत्र देण्यात आले आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १८३ (ग) आणि म.वि.प. नियम-११ अनुसार, आम्ही पुढील प्रस्तावाची सूचना देत आहोत. “महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माननीय उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावल्याने त्यांना विधानपरिषदेच्या उपसभापती पदावरून दूर करण्यात यावे,” अशा आशयाचे पत्र विधानपरिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावाने देण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील विधान परिषदेच्या आमदारांनी हे पत्र लिहिले आहे.

या अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर शिवसेनेचे (ठाकरे) अनिल परब, सुनील शिंदे, सचिन अहिर, ज. मो. अभ्यंकर, मिलिंद नार्वेकर तसेच काँग्रेसचे नेते भाई जगताप, अभिजित वंजारी, राजेश राठोड आणि राष्ट्रवादीकडून (शरद पवार) एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे आता सभापती काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून गेले दोन दिवस नीलम गोऱ्हे या विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी झालेल्या नाहीत. पण त्या गुरुवारी विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्या आजारी असल्याने अधिवेशनासाठी येऊ शकल्या नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

आमच्याकडून उशीरच झाला - उद्धव ठाकरे

अविश्वासाचा प्रस्ताव आणायला आमच्याकडून उशीरच झाला. आतापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या. अविश्वाचा प्रस्ताव आणल्यानंतर या अधिवेशनातच त्याबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे. ज्याने एखाद्या नियमाचा आणि कायद्याचा भंग केला असेल, तो कुणीही असो, त्यावर कारवाई व्हायला हवी. अविश्वासाचा ठराव ज्या कारणासाठी आणला ती कारणे तुमच्यासमोर येतील. पण पक्षांतर हाही एक विषय आहे. यापूर्वीच हा ठराव मांडला पाहिजे होता,” असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई