पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई आणि ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणे अवघड असल्याचे शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी येथे सांगितले.
पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा सदस्य नोंदणीचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना कशा पद्धतीने होईल,याचा विचार करण्यापेक्षा आपण ज्या भागात राहतो, त्या भागामध्ये काम सुरू करणे आवश्यक आहे. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये युती होईल का नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर मला वाटत नाही की, पुणे महापालिकेमध्ये युती होईल. मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणे अवघड आहे. युती झाली, तर आनंद आहे. मात्र, त्यावरती अवलंबून न राहता कामाला लागण्याची आवश्यकता आहे.
बारामती, शिरूर यांसारख्या मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांची ताकद आहे. त्या ठिकाणी ते स्वबळाचा विचार करू शकतात. मात्र, ज्या पद्धतीने डीपीसीमध्ये निधीबाबत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तीस-तीस, वीसचा फॉर्म्युला ठरला आहे. याच प्रकारचा फॉर्म्युल्यानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठरला तर ते चांगलेच असेल. मात्र, आतापासूनच बंडखोरीचा विचार मनात येत असेल, तर सोडून द्या असेही त्यांनी सांगितले.
५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तर उरलेल्या ५० टक्के सर्वसाधारण जागांमध्ये चार कॅटेगरीच येतात. सर्वसाधारण, एससी, एसटी आणि ओबीसी त्यामुळे प्रत्येक महापालिका क्षेत्रातील प्रभागासाठी संभाव्य आठ उमेदवारांची आवश्यकता आहे. त्यामुळे आरक्षण निश्चित झाल्यानंतर त्यातील एक उमेदवार निश्चित होईल. मात्र प्रत्येक प्रभागांमध्ये पर्यायी उमेदवार उभा करणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.