महाराष्ट्र

Nepal Bus Tragedy Update: भुसावळच्या २४ भाविकांचा मृतांमध्ये समावेश; आज नाशिकला आणणार मृतदेह

नेपाळमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये उत्तर प्रदेशामधून काठमांडूकडे जाणारी एक खासगी बस १५० मीटर खोल नदीत कोसळून २७ भाविकांचा मृत्यू झाला, तर अन्य १६ जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत पावलेल्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील २४ जणांचा समावेश आहे.

Swapnil S

नेपाळमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये उत्तर प्रदेशामधून काठमांडूकडे जाणारी एक खासगी बस १५० मीटर खोल नदीत कोसळून २७ भाविकांचा मृत्यू झाला, तर अन्य १६ जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत पावलेल्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील २४ जणांचा समावेश आहे.

दुथडी भरून वेगाने वाहणाऱ्या नदीत बस कोसळल्याने अनेक भाविक वाहून गेल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. हे सर्व भाविक जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल, आचेगाव, पिंपळगाव परिसरातील होते. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून ही बस काठमांडू येथे जात असताना ती आयना पाहरा येथे महामार्गावरून घसरली आणि नदीत कोसळली. या बसची नोंदणी उत्तर प्रदेशातील होती आणि बसचा क्रमांक ‘यूपी ५३ एफटी ७६२३’ असा होता. बसमध्ये चालक-सहचालकासह ४३ प्रवासी होते.

महाराष्ट्रातून १०४ भाविकांचा एक गट तीन बसगाड्यांमधून १० दिवसांच्या पर्यटनासाठी नेपाळमध्ये आला होता. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधील काही गावांतून हे भाविक येथे आले होते. पोखरा येथे भेट दिल्यानंतर सर्व म्हणजे तीनही बसगाड्या काठमांडूसाठी रवाना झाल्या होत्या. यापैकी एक बस १५० मीटर खोल मर्स्यागंडी नदीत कोसळली, असे भारतीय दूतावासातून सांगण्यात आले.

घटनास्थळावरून २७ जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, जखमी १६ जणांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नदीच्या तीरावर कोसळलेल्या या बसचा चक्काचूर झाला आहे. नेपाळ लष्कराचे ‘एमआय-१७’ हेलिकॉप्टर वैद्यकीय पथकासह घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाशी संपर्क साधला व त्या मार्फत नेपाळशी संपर्क साधला गेला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे सतत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. या अपघाताचे वृत्त समजताच भुसावळमधील संबंधित गावांवर शोककळा पसरली आहे.

भाविकांनी तीन बस बुक केल्या होत्या

महाराष्ट्रातील काही भाविकांनी जवळपास चार महिन्यांपूर्वी नेपाळला जाण्यासाठी केसरवाणी ट्रॅव्हल्सच्या तीन बसगाड्या बुक केल्या होत्या. किमान ११० भाविक या बसगाड्यांमध्ये होते.

२४ जणांचे मृतदेह आज नाशिकला आणणार

नेपाळमधील अपघातात मृत पावलेल्या महाराष्ट्रातील २४ जणांचे मृतदेह विमानाने शनिवारी नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून भुसावळमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांकडे ते सोपवण्यात येणार आहेत. या अपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर हवाई दलाचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी