मुंबई : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे महाराष्ट्रातील २९० पर्यटक विविध भागांत अडकले असून ते सुरक्षित असल्याची माहिती राज्य सरकारच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क झाल्यानंतर स्पष्ट झाली आहे. मात्र, महाराष्ट्रातील ६० पर्यटकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.
एकूण ३९५ पर्यटकांपैकी १०५ जण भारताच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागले आहेत. उर्वरित २९० जणांशी नियंत्रण कक्षाचा संपर्क झाला असून ते सुरक्षित आहेत. मात्र विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. नागपूर जिल्ह्यातील श्री स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये गेलेले ११० नागरिक सुरक्षित आहेत. या नागरिकांमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.मुंबईस्थित रिचा टूर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून नेपाळ दौऱ्यावर गेलेल्या ६० जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, तिबेटमध्ये कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण केल्यानंतर अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ यात्रेकरूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर शुक्रवारी सकाळी काठमांडूच्या दिशेने प्रवास सुरू केला. ठाणे, पुणे, रायगड, अलिबाग आणि डोंबिवली येथील यात्रेकरूंचा या गटात समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानुसार, हा गट सकाळी सुमारे ६ वाजता तिबेटमधील सागा येथून न्यालम तपासणी नाक्यामार्गे नेपाळची राजधानी काठमांडूकडे रवाना झाला. या यात्रेकरूंचे काठमांडूहून २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता भारतासाठीचे विमान नियोजित आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ट्रॅव्हल्सचे टूर ऑपरेटर दर्शन गुंजाळ यांनी ४५ जणांच्या ग्रुपबाबत माहिती दिली आहे. या समूहात अहिल्यानगरमधील २७, नाशिकमधील १२, पुण्यातील ५ तर मुंबईतील एका पर्यटकाचा समावेश असल्याची माहिती दिली. हा ग्रुप नेपाळ येथील चितवन येथे आहे. सर्वजण सुखरूप असून ग्रुप नेपाळमधील लुंबिनी येथे पोहोचणार आहे. लुंबिनी येथे मुक्काम करून हा ग्रुप उद्या आयोध्याकडे निघणार असल्याचे गुंजाळ यांनी कळविले आहे.
चौकट महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत (एसडीएमए) अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी एक https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf विशेष ऑनलाइन फॉर्म तयार करण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अडकलेल्या नागरिकांची माहिती संबंधित लिंकवरून तात्काळ भरून डेटाबेसमध्ये अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.