पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि भावपूर्ण मानला जाणारा नीरा स्नान सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. 'माऊली... माऊली'च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि हजारो वारकरी-भाविकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र पात्रात स्नान घालण्यात आले. या मंगल सोहळ्यानंतर पालखीने पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सातारा जिल्ह्यात मोठ्या भक्तिभावाने प्रवेश केला.
नीरा नदीतील या पारंपरिक स्नानाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. पालखी सोहळ्याचा अर्धा प्रवास पूर्ण झाल्यानंतर तसेच सोहळ्याचे प्रवर्तक हैबतबाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी पादुकांना स्नान घालण्याची परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे. आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, सोहळा प्रमुख भावार्थ देखणे आणि अन्य मानकऱ्यांच्या उपस्थितीत दत्त घाटावर विधीवत पादुकांचे स्नान पार पडले. यावेळी स्थानिक महिलांनी मंदिरासमोर फुगड्या खेळत आपला आनंद व्यक्त केला, तर हजारो भाविकांनी नदीच्या दोन्ही तीरांवर गर्दी करून या पवित्र सोहळ्याचे दर्शन घेतले.
पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भाविकांकडून फुलांची उधळण करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, तात्पुरती आरोग्य केंद्रे, रुग्णवाहिका, स्वच्छतागृहे आणि विश्रांतीची चोख व्यवस्था केली आहे. तसेच विविध सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांनी फराळ, पिण्याचे पाणी व वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी संपूर्ण पालखी मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
माऊलींचे औपचारिक स्वागत
पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच नीरा पुलावर जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या वतीने माऊलींचे औपचारिक स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन तसेच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे उपस्थित होते. पोलीस बँडच्या सुरेल वादनाने स्वागत सोहळ्याची शोभा अधिकच खुलली.
तीन प्रमुख मंत्र्यांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी माऊलींचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला. तीन प्रमुख मंत्र्यांची एकाच व्यासपीठावरील उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. मात्र, या राजकीय चर्चांपेक्षा 'माऊली'च्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांसाठी हा दिवस भक्ती, समता आणि अध्यात्माचा अविस्मरणीय उत्सव ठरला. नीरा स्नान सोहळ्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाली.