राजन चव्हाण / कुडाळ
सत्ताधारी पक्षात राहून जिल्ह्याच्या राजकारणात 'मिठाचा खडा' टाकणाऱ्या आणि अंतर्गत वाद पेटवून स्वतःच्या पोळ्या भाजणाऱ्या स्वकीयांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जोरदार इशारा दिला. पक्षातील तीन-चार 'शकुनी मामा' आणि त्यांची टीम गेल्या काही महिन्यांपासून आमच्यात दरी निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यांनी ही मस्ती थांबवावी, अन्यथा त्यांचा हिशोब चुकता केला जाईल, असा थेट इशारा त्यांनी दिला.
कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम उशिरा सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालला. यावेळी व्यासपीठावर खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, शिंदे सेनेचे उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संदीप कुडतरकर आदी उपस्थित होते. आपल्या भाषणात नितेश राणे यांनी पक्षातील काहींच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. काहीजण संध्याकाळी बसून फक्त चर्चेचे गुऱ्हाळ चालवतात. जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येण्याऐवजी, जे चांगले काम सुरू आहे त्यात अडथळे कसे आणायचे, हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. नगरपालिका निवडणुकीपासून जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत 'काड्या' लावणारे हेच लोक आहेत, असे ते म्हणाले.
आमदार निलेश राणे यांच्या कामाचे कौतुक करताना ते म्हणाले, विधिमंडळात मुद्देसूद आणि आकडेवारीनिशी मांडणी करण्याची त्यांची शैली वाखाणण्याजोगी आहे. समोरचा मंत्री आपलाच सहकारी असला तरी जनहितासाठी त्यांना धारेवर धरण्याची त्यांची भूमिका मी जवळून पाहिली आहे. यावेळी त्यांनी कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांचे नाव न घेता, ते चुकून दोन वेळा निवडून आले होते, असा टोला लगावला. येत्या चार वर्षांत कोणत्याही निवडणुका नसल्याने आता पूर्ण लक्ष विकासकामे आणि संघटनात्मक बांधणीवर असेल, असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. नारायण राणे, निलेश राणे आणि दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास होणारच; पण पक्षाला पोखरणाऱ्या 'शकुनी मामांचा' हिशोबही चुकता केला जाईल, असे त्यांनी सूचक विधान केले.
मंत्री रवींद्र चव्हाण हे साधे आणि पक्षाशी एकनिष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. मात्र, त्यांच्या आणि आमच्या कुटुंबात तसेच निलेश राणे यांच्यात जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचे प्रयत्न काहींकडून सुरू आहेत. व्यासपीठावर बसलेल्यांनाही मी कोणाबद्दल बोलतोय, हे माहीत आहे. त्यामुळे अशा लोकांनी आता थांबावे.नितेश राणे, आमदार
आम्ही या जिल्ह्याकडून काही घ्यायला नाही, तर भरभरून द्यायला आलो आहोत. सिंधुदुर्गातील जनता सुखी आणि समाधानी राहावी, हेच आमचे ध्येय आहे. आमदार निलेश राणे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, माझ्या दोन्ही मुलांना तुमचे आशीर्वाद कायम मिळू द्या.नारायण राणे, खासदार
नारायण राणे झाले भावूक
खासदार नारायण राणे यांनी आपल्या भाषणात भावनिक भूमिका मांडली. आजवर मी अनेक पदे भूषवली, आयुष्यात जे हवे होते ते मिळाले. आता मला काहीच नको. माझ्या मुलांनी निलेश आणि नितेशने आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या कामगिरीवर मी समाधानी आहे, असे ते म्हणाले. प्रकृती ठीक नसतानाही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांची 'दादा' म्हणून मारलेली हाक मला ऊर्जा देते. तुम्हाला भेटल्यानंतर माझे निम्मे आजारपण दूर होते, असे त्यांनी नमूद केले.