राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगा (एक्स)
महाराष्ट्र

राज्यातील २० वैद्यकीय महाविद्यालयांना नोटीस; विद्यावेतनाचा तपशील सादर न केल्याने कारवाई आयोगाच्या निर्णयाला संस्थांकडून वाटाण्याच्या अक्षता

वैद्यकीय महाविद्यालयांमधील बेहिशेबी निधीच्या वापरामध्ये पारदर्शकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा तपशील जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र राज्यातील तब्बल २० वैद्यकीय शिक्षण संस्थांनी आयोगाच्या या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयांमधील बेहिशेबी निधीच्या वापरामध्ये पारदर्शकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा तपशील जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र राज्यातील तब्बल २० वैद्यकीय शिक्षण संस्थांनी आयोगाच्या या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे आयोगाने कारवाईचा बडगा उगारला असून २० महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाचा तपशील प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने एप्रिल २०२४ रोजी दिले आहेत. यानंतरही राज्यातील २० वैद्यकीय महाविद्यालयांनी या निर्णयाकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे आयोगाने या महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.

पदवी वैद्यकीय आंतरवासिता आणि निवासी डॉक्क्टरांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाचा तपशील सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला दिले आहेत. त्यानुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पदवी आंतरवासिता, निवासी डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि विषेशोपाचार रुग्णालयातील (सुपर स्पेशालिटी) पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दिलेल्या विद्यावेतनाचा तपशील सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशातील सर्व आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालये यांना दिले आहे. हा तपशील २३ एप्रिल २०२४ पर्यंत आयोगाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य संस्थांनी त्यांच्या विद्यावेतनाचा तपशील स्वत:च्या संकेतस्थळावर मासिक पद्धतीने प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत अद्ययावत करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या.

आयोगाच्या या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालयांमधील बेहिशेबी निधीच्या वापरामध्ये पारदर्शकता येईल, असे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत होते. मात्र राज्यातील २० वैद्यकीय महाविद्यालयांनी या निर्देशाकडे दुर्लक्ष केले आहे. यामध्ये शासकीय ११ आणि खासगी ९ वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. विद्यावेतनाचा तपशील सादर न करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने बजावली आहे.

तपशील सादर करण्यास तीन दिवसांची मुदत

विद्यावेतनाचा तपशील सादर न करणाऱ्या महाविद्यालयांनी कारणे दाखवा नोटीस मिळाल्यापासून पुढील तीन दिवसांमध्ये तातडीने तपशील सादर करावा, अशा सूचनाही आयोगाने केली आहे.

देशातून १९८ वैद्यकीय महाविद्यालयांना नोटीस

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील विद्यावेतनाचा तपशील सादर करण्याच्या आयोगाच्या सूचनेकडे देशातील १९८ वैद्यकीय महाविद्यालयांनी दुर्लक्ष केले आहे. यामध्ये शासकीय ११५ महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच या यादीत ८३ खासगी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. तपशील सादर न करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक तेलंगणा व राजस्थानमधील प्रत्येकी १२ महाविद्यालये आहेत. महाराष्ट्रामध्ये ११ आणि कर्नाटकमध्ये १० वैद्यकीय महाविद्यालये आहेत. तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक तेलंगणामध्ये १३ महाविद्यालये असून, त्याखालोखाल महाराष्ट्र ९, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी आठ महाविद्यालये आहेत.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश