कुख्यात गुंड सचिन घायवळला राजस्थानमध्ये बेड्या (Photo - डावीकडून निलेश घायवळ आणि सचिन घायवळ)
महाराष्ट्र

कुख्यात गुंड सचिन घायवळला राजस्थानमध्ये बेड्या

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात गुंड सचिन घायवळ याला राजस्थानमधून अटक केली आहे.

Swapnil S

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात गुंड सचिन घायवळ याला राजस्थानमधून अटक केली आहे. कोथरूड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या घायवळ टोळीचा तो प्रमुख सदस्य मानला जातो. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातून त्याला जेरबंद करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा सख्खा भाऊ असून, निलेश घायवळनंतर टोळीची सूत्रे त्याच्याकडे होती. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. राजस्थानमध्ये वास्तव्य करताना त्याने स्वतःची ओळख लपविण्यासाठी नाव आणि वेशभूषाही बदलली होती.

मात्र, पुणे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर राजस्थानमध्ये सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.

सचिन घायवळ याच्याविरोधात कोथरूड गोळीबार प्रकरण, खंडणी, जबरी मारहाण, अपहरण, जीवे मारण्याची धमकी आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रे बाळगणे यांसह एकूण ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच कोथरूड परिसरातील १० फ्लॅट बळकावल्याचाही गंभीर आरोप त्याच्यावर आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.

अटकेनंतर सचिन घायवळला पुण्यात आणून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सचिन घायवळचे पुण्यातील काही राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याची चर्चा सुरू असून, पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

या कारवाईमुळे कोथरूड परिसरातील घायवळ टोळीच्या दहशतीला मोठा धक्का बसला असून, टोळीला मदत करणारे आणि त्यांच्याशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढविली आहे.

...तर कंत्राटदारांवर थेट कारवाई! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा; पायाभूत सुविधांचे प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश

FDA चे २०३ आस्थापनांवर छापे, १०२ जणांना अटक; तुकाराम मुंढे यांची अवैध गुटखा व भेसळीविरोधात कारवाई

कोकण रेल्वेची जुलैपासून रत्नागिरी ते जेएनपीटी थेट कंटेनर रेल्वे सेवा

ठाणे-पालघर विधान परिषद निवडणूक बिनविरोध; अभिजीत पवार यांचा उमेदवारी अर्ज मागे

आजवर १८ लाख रोपे दिली भेट; सुधाकर देशमुख नावाच्या वृक्षमित्राची कहाणी