नवी दिल्ली : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसह गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या ढोल-ताशा पथकांमध्ये ३० जणांचाच सहभाग असावा, अशी मर्यादा राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) घातली होती. त्याला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने राज्यातील अधिकाऱ्यांवर याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. पुण्यात ढोल-ताशांना सांस्कृतिक महत्त्व आहे. जवळपास १०० वर्षांची परंपरा आहे आणि त्याची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली आहे. ‘एनजीटी’ने ३० ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशामुळे याला बाधा पोहोचणार आहे, असा युक्तिवाद वकिलांनी केला.
ढोल-ताशा पथकामध्ये किती जणांचा समावेश असावा याबाबतच्या आदेशाला स्थगिती देण्यात येत आहे. त्यांना ढोल-ताशा वाजवू द्या, ते पुण्याचे हृदय आहे, असे पीठाने म्हटले आहे. ढोल-ताशा-झांजच्या प्रत्येक पथकामध्ये ३० हून अधिक जण नसावेत, असा आदेश ‘एनजीटी’ने पुणे पोलिसांना दिला होता.