मुंबई : राज्य शासनाने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांसह 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू केली आहे. या योजनेचा पहिल्या दोन महिन्यांचा लाभ राज्यातील पात्र भगिनींना डिबीटीद्वारे नुकताच वितरीत करण्यात आला. यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील बचतगट चळवळीतील उमेद अभियानातील महिला या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक कोटी राख्या पाठविणार आहेत.
राज्यातील बचत गटाच्या महिलांमार्फत राखी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री शिंदे यांना राखी पाठविण्यात येणार आहे. १९ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेला मोठ्या भावाला राखी बांधण्यासाठी 'चलो मुंबई' असा नारा गावोगावात महिला देत आहेत. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर जाऊन 'उमेद' संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांना राखी बांधली जाणार असल्याची माहिती 'उमेद' संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.