महाराष्ट्र

लासलगावात कांदा शेतकरी आक्रमक; दरात घसरण झाल्याने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

लासलगाव बाजार समितीच्या आवारात उन्हाळ व लाल कांद्याच्या दरात शुक्रवारच्या दराच्या तुलनेत सोमवारी ३०० ते ५०० रुपये क्विंटल सरासरी भावात घसरण झाली.

Swapnil S

हारून शेख/लासलगाव

लासलगाव बाजार समितीच्या आवारात उन्हाळ व लाल कांद्याच्या दरात शुक्रवारच्या दराच्या तुलनेत सोमवारी ३०० ते ५०० रुपये क्विंटल सरासरी भावात घसरण झाली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी व विविध संघटनेच्या नेत्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीतील जलकुंभावर चढवून शोले स्टाईल आंदोलन केले. विधानसभेत कांदा प्रश्नावर चर्चा करणार असल्याच्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आश्वासनानंतर व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, खासदार भास्कर भगरे आणि पोलीस व महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने एक तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

उन्हाळ व लाल कांद्याच्या बाजार भावात दररोज घसरण होत आहे. सोमवारी येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू होताच शुक्रवारी विक्री झालेल्या कांदा भावाच्या तुलनेत उन्हाळ व लाल कांद्याच्या कमाल भावात ३०० व सरासरी भावात ५०० रुपये क्विंटल मागे घसरण झालेली दिसून आल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला. प्रहार जनशक्ती पक्ष, जय किसान फोरम, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना, छावा क्रांती संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडत राज्य व केंद्र सरकारचा निषेध केला. कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क तत्काळ हटवावे, निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना शोधाव्यात, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना स्पर्धात्मक बाजार भाव मिळण्यासाठी नाफेड एनसीसीएफद्वारे बाजार समिती आवारात कांदा खरेदी करावी, यासह विविध मागण्यांची जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले.

अचानक जल कुंभावर चढून आंदोलन सुरू झाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. कांदा प्रशनी बाजार समितीत शेतकऱ्यांसह विविध संघटनेचे शोले स्टाईल आंदोलन सुरू असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना समजताच विधानसभेत या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आजच आवाज उठविणार आहे असे आश्वासन त्यांनी दिले. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधला. कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी लवकरच चर्चा करत निर्यात शुल्क रद्द केले जाईल असे आश्वासन देण्यात आले.

...तर तीव्र आंदोलनाचा इशारा

खासदार भास्कर भगरे यांनी दिल्ली येथून आंदोलकांशी संपर्क साधला. संबंधित मंत्र्याची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांना खाली येण्याची विनंती केली. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन आंदोलन मागे घेतले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली