पार्थ पवार यांची शरद पवारांशी पुन्हा भेट; आमच्या भेटीत राजकीय चर्चा नाही - प्रफुल्ल पटेल संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

पार्थ पवार यांची शरद पवारांशी पुन्हा भेट; आमच्या भेटीत राजकीय चर्चा नाही - प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सरचिटणीस पार्थ पवार यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, तर दुसरीकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मौन सोडले. आपण पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली...

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सरचिटणीस पार्थ पवार यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, तर दुसरीकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मौन सोडले. आपण पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या ४८ तासांत पार्थ पवार यांची शरद पवार यांच्याशी झालेली ही दुसरी भेट आहे. दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी शनिवारीही दक्षिण मुंबईतील शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. छातीत संसर्ग आणि श्वसनाच्या त्रासावर उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

अनेक नेत्यांनी शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश होता. पटेल आणि पवार यांच्या भेटीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दोन्ही नेते १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीबाबत बोलत होते, असे दिसत होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता निर्माण झाली होती.

अजित पवार गटाच्या नाराज नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांचे पुत्र पार्थ यांच्याविषयी तक्रार केल्याची चर्चा रंगली होती. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बंडाच्या पवित्र्यात असल्याचेही सांगण्यात येते. त्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरण्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले. त्यामुळे पटेल आणि पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला होती.

फक्त प्रकृतीची विचारपूस केली...

शरद पवार यांना आपण ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त गोंदियामध्ये असणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे १० नोव्हेंबरपासून आपण मुंबईत असू आणि पुन्हा त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेईन, असे त्यांना सांगितले. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, प्रकृतीची विचारपूस केली, असे पटेल यांनी पत्रकारांना सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘गोकुळ’साठी आज कोल्हापुरात 'संघर्ष मोर्चा'

दिमागी नक्षलचा धोका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, जवानांसोबत साजरी केली दिवाळी

राष्ट्रवादी विलीनीकरणाचा घोळ संपेना..!

बांधापासून महामार्गापर्यंतचा विकास प्रवास!

आजचे राशिभविष्य, ९ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत