मुंबई : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त राज्यात सर्व शाळांमध्ये १४ ऑगस्ट रोजी पसायदानाचे सामूहिक पठण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
सन २०२५ वर्ष हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीचे वर्ष आहे. यानिमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींचा पसायदानाच्या माध्यमातून दिलेला विचार राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये एकाच वेळी पोहचावा असा शासनाचा उद्देश आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी पुणे येथील शिक्षण विभागाचे आयुक्त यांना यासंदर्भात कळविले आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून हे आदेश राज्यातील सर्व अनुदानित, विना अनुदानित, खासगी, महापालिका, जिल्हा परिषद, संस्थात्मक शाळांना कळविण्यात आले आहेत.