महाराष्ट्र

गणपतींचे माहेरघर 'पेण'! पेणच्या गणेशमुर्तींना जगन्मान्यता

आपल्या देशातील, राज्यांतील विविध गावात काहीतरी विशेष बाब आहे. जसे की आंब्याचा विषय निघाला की ज्याप्रमाणे रत्नागिरी हापूसचा उल्लेख होतो. आग्रा म्हटले की ताजमहाल डोळ्यासमोर दिसतो. अगदी तोच मान गणेशमूर्तीबाबतीत रायगड जिल्ह्यातील 'पेण' या गणपतींच्या गावाला आहे.

Swapnil S

अरविंद गुरव/पेण

आपल्या देशातील, राज्यांतील विविध गावात काहीतरी विशेष बाब आहे. जसे की आंब्याचा विषय निघाला की ज्याप्रमाणे रत्नागिरी हापूसचा उल्लेख होतो. आग्रा म्हटले की ताजमहाल डोळ्यासमोर दिसतो. अगदी तोच मान गणेशमूर्तीबाबतीत रायगड जिल्ह्यातील 'पेण' या गणपतींच्या गावाला आहे. पेणला कोकणातील पुणे अशा नावानेही ओळखले जाते. कारण पेण येथील कोल्हटकरांची मुलगी पेशव्यांची सून झाल्याने पेणची कोकणातील पुणे म्हणून ओळख आहे.

पेणची दुसरी ओळख म्हणजे पोह्याचे पापड. तरीही, गणेशमूर्तीच्या कार्यशाळा आणि पेण हे समीकरण काळाच्या ओघात अधिकाधिक घट्ट झाले आहे. गणेशमूर्तीच्या निर्मितीचा शतकोत्तर वारसा लाभलेले हे शहर देशाच्याच नाही तर जगाच्या नकाशावर - आपली ओळख बनवून आहे. त्यामुळे केवळ मुंबई-पुणे, इतर राज्येच नाही तर येथे बनणाऱ्या मूर्तीना सातासमुद्रापारही मागणी आहे. किंबहुना, पेणमध्ये असे असंख्य मूर्तिकार आहेत ज्यांचे ग्राहक वर्षानुवर्षे बांधलेले आहेत. या ग्राहकांमध्ये दरवर्षी वाढ होताना पाहायला मिळते.

गणेशमूर्तीचे माहेरघर पेणच का? असा प्रश्न काहींना पडणे स्वाभाविकच आहे. त्याचे उत्तर या शहरात पाऊल टाकल्यानंतर मिळते. येथे ठिकठिकाणी गणेशमूर्ती शाळाच दृष्टीस पडतात. या मूर्तीशाळांची संख्या पाहिल्यास कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. याचे श्रेय द्यायचे झाले तर ते देवधर कुटुंबीयांनाच दिले जाईल. कारण १८ व्या शतकात मूळचे विजयदुर्गचे असणारे भीकाजीपंत देवधर हे पेण येथे आले. सन १८६० साली पेण येथे खोतांचे राज्य होते. खोत म्हणजे सर्वात श्रीमंत व्यक्ती. त्यांच्याकडे भीकाजीपंत आपली कला सादर करायचे. त्याकाळी फेटे बांधणे, मूर्ती बनविणे, विविध कलेच्या वस्तू बनवणे याद्वारे ते आपला उदरनिर्वाह करायचे. कालांतराने त्यांनी मातीच्या मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. भारतात हिंदू धर्मीयांमध्ये मूर्तिपूजेला विशेष महत्त्व आहे. पूर्वी म्हणजेच १८६० ते १९२० पर्यंत येथील लोक आपल्या अंगणातील माती खणून त्याच्या गणेशमूर्ती बनवून त्या पूजत. गणेशमूर्ती पूजन ही पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. यामागचे कारण असे की, या सृष्टीतील ईश्वराने निर्मिलेले सर्व काही नश्वर आहे. मातीतून आलेले मातीतच जायचे. यासाठी श्रीगणेशाच्या मातीच्या मूर्ती बनवून गणपतीला ५ ते ७ दिवसांसाठी पाहुणा म्हणून घरी आणायचे. त्याचा पाहुणचार करून पुन्हा त्याच्या घरी पाठवायचे. म्हणजे मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे, अशी आपल्या धर्मातील प्रथा आहे.

सन १९२० या काळात गणेशमूर्ती बनविण्याची ही कला फक्त मर्यादितच होती. पण १९४० ते १९५० साली लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिल्यानंतर पेण येथील देवधरांनी याचा फायदा घेत मातीच्या गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली. त्यांनी पेणमधील साधारण ७० ते ८० कारागिरांची फौज तयार करून त्यावेळी २०० ते ३०० मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. प्रत्येक कारागिराला २ ते ५ रुपये पगार दिवसाला मिळू लागला. तयार झालेल्या गणेशमूर्ती मुंबई आणि पुण्याला विकण्यासाठी ते गणेशोत्सवाच्या १० ते २० दिवस आधी घेऊन जात.

आज या व्यवसायावर किती जणांचा उदरनिर्वाह होतो, याची माहिती केवळ थक्क करणारी आहे. आता येथील हजारो मूर्तीशाळांनी शेकडो, हजारो नाही तर लाखभर लोकांना उपजीविकेचे साधन दिले आहे. विशेष म्हणजे, ही सर्व मंडळी स्थानिक आहेत. मुंबई वा अन्य ठिकाणी स्थानिक कामगारांची चणचण भासत असताना, तसेच या व्यवसायातही परप्रांतीयांनी चंचुप्रवेश केला असताना पेणमध्ये मात्र हा अनेक कुटुंबांचा परंपरागत व्यवसाय आहे, हे विशेष. ज्या कारखानदारांना घरातील मंडळींचे सहकार्य शक्य नसेल त्यांच्यासाठी स्थानिक तरुण उपलब्ध असतातच. गणेशोत्सव भाद्रपदात येत असल्याने हा उद्योग त्या महिन्यापुरताच मर्यादित असेल, असेही वाटू शकते. या आघाडीवरही या उद्योगाचे आगळे वैशिष्ट्य समोर येते. अनंत चतुर्दशीनंतर १० दिवस विश्रांती घेतल्यानंतर या मंडळींची पुढील वर्षीच्या मूर्ती घडविण्याची लगबग सुरू होते. यानंतर अनेक वर्षांच्या ठराविक वेळापत्रकाप्रमाणे टप्प्याटप्प्याने मूर्ती घडविण्याचे काम वेग घेते आणि साधारण जुलैपासून या मूर्तीची पाठवणी सुरू होते.

या व्यावसायिकांचे अर्थकारणही असेच शिस्तबद्ध आहे. जवळपास प्रत्येक व्यावसायिक पेणमधील राष्ट्रीयकृत बँकांमधून १० लाख रुपयांचे कॅश क्रेडिट घेतो. मूर्तीसाठीचा कच्चा माल घेण्यापासून ते कामगारांचा पगार आदींसाठी ही कर्जरक्कम खर्ची पडते. गणेशोत्सव संपल्यानंतर हे व्यावसायिक या कर्जाची सव्याज परतफेड करतात आणि काही दिवसांतच पुढील वर्षासाठी पुन्हा नवे क्रेडिट घेतात. या मूर्तीशाळांमध्ये नकळत दोन प्रकारची विभागणी झाल्याचे दिसते. मूर्ती घडविण्यापासून रंगकाम व अंतिम साज देण्याचे काम पेण शहरातील मूर्तीशाळांत केले जाते. या मूर्तीच्या डोळ्यांची आखणी हे पेणचे वैशिष्ट्य आहे. श्रीगणेशाच्या डोळ्यांतील भाव योग्यपणे साकारण्याचे कौशल्य या कलाकारांकडे आहे. दुसरीकडे, पेणच्या वेशीवर असलेल्या हमरापूर, जोहा व आसपासच्या गावांमध्ये प्रामुख्याने मूर्ती घडविण्याचे काम केले जाते. पेण तालुक्यातून मूर्तीनी भरलेले ट्रक परगावी निघतात, त्याचवेळी पुढील वर्षासाठीचा कच्चा माल भरून निघालेले ट्रक पेणच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतात. ही 'मूर्ति' मंत संस्कृतीची पाळेमुळे काळाच्या ओघात आणखी घट्ट होत आहेत.

देवधरांच्या कारखान्यातील कारागीर तेथून बाहेर पडून स्वतःचा गणेशमूर्ती बनविण्याचा कारखाना थाटू लागले. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्याइतके असणाऱ्या य कार्यशाळांनी २००, ३०० आणि आता ७०० चा आकडा केव्हा पार केला हे कळलेच नाही. पेण शहरात सद्यःस्थितीत तब्बल छोट्या-मोठ्या ७५० मूर्तीशाळा आहेत आणि पेण तालुक्याचा विचार केला तर ही संख्या हजाराच्या वर जाते. या संख्येत दरवर्षी भरही पडते. स्पर्धक वाढल्यानंतर खरे तर बाजारावर विपरीत परिणाम होतो, मात्र हा व्यवसाय यास अपवाद आहे. यातील एकाही मूर्तीशाळेला तोट्याची झळ म्हणजे काय, ते ठाऊक नाही. तोटा राहिला दूर, या मूर्तीशाळांमधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. एका मूर्तीशाळेत किमान दोन ते तीन हजार मूर्ती होत असतील आणि त्यातील प्रत्येक मूर्तीची किंमत किमान पाच-सातशे रुपये आहे, असे मानले तर हजार मूर्तीशाळांमधून किती कोटींची उलाढाल होत असेल, याचा केवळ अंदाजच करावा.

कच्चा माल आणि रंग साहित्य वेळेवर उपलब्ध न झाल्याने परिणामी गणेशमूर्तीचे दर वाढतात आणि याची झळ समस्त गणेशभक्त ग्राहकांना बसते. त्यामुळे सरकार आणि प्रशासनानेही याची दखल घेऊन 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या मूर्तीचा स्वीकार करून पेणमधील गणपती कारखानदारांना आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

पेणमध्ये कशा बनल्या 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या मूर्ती
पेणमध्ये सुरुवातीच्या काळात मातीच्याच मूर्ती बनत, पण माती वजनाने जड आणि सुकण्यासाठी ३ ते ५ दिवसांचा अवधी घेत असल्याने गणपतीच्या मूर्ती वेळेत पूर्ण होत नसत. 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या मूर्तीचे प्रदर्शन मुंबई येथे लागले आहे, असे देवधरांच्या तिसऱ्या पिढीतील राजाभाऊ देवधर आणि वामनराव देवधर यांना समजल्यावर क्षणाचाही विलंब न करता आपल्या काही कारागिरांना सोबत घेऊन त्यांनी मुंबई गाठली. 'प्लास्टर ऑफ पॅरिस 'पासून मूर्ती कशी बनते याचे प्रात्यक्षिक व त्याचे रबरापासून साचे बनविण्याची कला शिकून त्यांच्या कार्यशाळेत गणपतीच्या 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या मूर्ती बनविण्यास त्यांनी सुरुवात केली.

प्रतीक्षा संपली, बाप्पा आज घरोघरी! चैतन्यमूर्तीच्या आगमनासाठी मुंबईसह राज्यात उत्साहाला उधाण

भारतावर 'टॅरिफ' विघ्न! अमेरिकेकडून अतिरिक्त २५ टक्के 'टॅरिफ' लागू; भारताच्या ४८ अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका

हायकोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम

मुंबईच्या लढाईत ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने; गणेश मंडळांसाठी शिवसेनेची रणनीती

आता दररोज १३ तास काम! वाढीव तास काम करण्यास मुभा; महिलांना रात्रीच्या शिफ्टसाठी परवानगी