नागपूर : फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या केली, त्याआधी सुसाइड नोट लिहिली, त्यात त्या महिलेचे हस्ताक्षर असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच पोलीस अधिकारी बदने यांनी मृत महिला डॉक्टरचे शोषण केल्याचेही तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे याप्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात होताच प्रश्नोत्तरांचा तास घेण्यात आला. भाजप आमदार अमित साटम यांनी फलटण जिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी प्रश्न उपस्थित केला. यावेळी विजय वडेट्टीवार, प्रकाश साळुंखे, ज्योती गायकवाड, नाना पटोले यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सहभाग घेतला. महिला डॉक्टरच्या हातावर जी सुसाइड नोट लिहिलेली होती, ती तिनेच लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले.
डॉक्टरने दबावातून आत्महत्या केली आहे का? आणि याप्रकरणी नेमण्यात आलेली एसआयटीचा तपास किती दिवसांत पूर्ण होणार? असा प्रश्न आमदार अमित साटम यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली, याप्रकरणी चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली आहे. तसेच ज्युडिशियल एन्क्वॉयरी कमिशन नेमले आहे. या प्रकरणात फॉरेन्सिकचा अहवाल प्राप्त झाला असून महिला डॉक्टरच्या हातावर जे लिहिलेले होते, ते हस्ताक्षर महिला डॉक्टरचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच जे आरोपी आहेत, त्यांनी महिला डॉक्टरवर दबाव आणला का? तर मुळात या केसमध्ये पोलीस अधिकारी बदने आहेत. त्या बदनेची जी माहिती आली त्यानुसार, बदनेने महिला डॉक्टरची फसवणूक करून शारीरिक शोषण केल्याचे समोर आले आहे.”
बदने यांनी महिला डॉक्टरला लग्नाचे आमिष दाखवल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मात्र बदनेने वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे बदनेने शोषण केल्याचे लक्षात येत आहे. तसेच, महिला डॉक्टरही मेडिकल ऑफिसर होती. त्यामुळे मेडिकलमध्ये जेव्हा एखाद्या आरोपीला अटक होते, तेव्हा तो आरोपी अटकेसाठी फिट आहे की नाही, याचा रिपोर्ट घ्यावा लागतो. डॉक्टर महिलेने अनफिट असल्याचे रिपोर्ट दिले होते. त्यामुळे पोलिसांनी मोठे पत्र त्यावेळी वरिष्ठांना लिहिले होते. ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते की, मोठ्या गुन्ह्यातील हे गुन्हेगार असून गुन्हेगारांना अनफिटचे रिपोर्ट दिले जात आहेत, अशी तक्रार केली होती. त्यानंतर तिनेही एक पत्र दिले होते. मात्र, हे जुने प्रकरण आहे, असे फडणवीस म्हणाले.
हत्या नसून आत्महत्या असल्याचे निष्पन्न
आतापर्यंतच्या तपासात महिला डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिचा गळा दाबून हत्या झाली नाही. शिवाय सुसाइड नोटमधील अक्षर तिचेच आहे. या दोन गोष्टी तपासात समोर आल्या आहेत. याप्रकरणी आरोपपत्र लवकरच दाखल होईल. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी न्यायधीशांची नेमणूकदेखील करण्यात आल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.