Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगला भीषण आग; अनेक वाहनांचे नुकसान, एक जखमी, Video (X - व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
महाराष्ट्र

Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगला भीषण आग; अनेक वाहनांचे नुकसान, एक जखमी, Video

प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

किशोरी घायवट-उबाळे

पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्ह्यातील चिंचवडमधील चापेकर चौकाजवळ असलेल्या चार मजली कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंग परिसरात गुरुवारी (दि. २९) मध्यरात्री सुमारे २.१० वाजता भीषण आग लागली. या घटनेत १२ दुचाकी, दोन चारचाकी आणि एका सायकलचे नुकसान झाले, तर एक व्यक्ती किरकोळ भाजली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी आग आटोक्यात आणली. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अग्निशमन दल घटनास्थळी

चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार मजली इमारतीच्या पार्किंग परिसरात आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्न केले. या मदतकार्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले.

चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर यांच्या माहितीनुसार, या आगीत १२ दुचाकी, दोन चारचाकी आणि एका सायकलचे नुकसान झाले. किरकोळ भाजलेल्या व्यक्तीला पुढील उपचारांसाठी तळेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे. आग पूर्णपणे विझवण्यात आली असून, घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वाहनांच्या नुकसानीच्या आकडेवारीत तफावत

या घटनेनंतर सुरुवातीला प्रसारित झालेल्या माहितीनुसार, १७ दुचाकी आणि दोन चारचाकी अशा एकूण १९ वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते. तसेच इमारतीच्या गच्चीवर अडकलेल्या १० ते १५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला होता.

मात्र, चिंचवड पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार, सायकलसह एकूण १५ वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच गच्चीवर अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेबाबत पोलिसांच्या निवेदनात उल्लेख नाही. त्यामुळे वाहनांच्या नुकसानीच्या आकडेवारीतील तफावत आणि गच्चीवरील नागरिकांच्या कथित सुटकेबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिवाळीपूर्वी मुंबई धूळ मुक्त; पालिकेची विशेष मोहीम, ९ दिवसांत प्रमुख रस्त्यांची स्वच्छता

Mumbai : २८ बांधकामांवर कारवाई; बोरिवली-विरार विस्तार मार्गाचा मार्ग मोकळा

Mumbai : ७ आरएमसी कारखान्यांना पालिकेची नोटीस; सात दिवसांत त्रुटी दूर करण्याचे निर्देश

Mumbai : धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा जागतिक डंका; आयबी शाळांच्या जागतिक क्रमवारीत नववे स्थान

Mumbai : वेसावा खाडीतील कांदळवनांची बेसुमार तोड; मच्छीमार सागरी हक्क समितीचा तीव्र आक्षेप