विलीनीकरणाचा फायदा भाजपलाच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पंडित नेहरू-पंतप्रधान मोदी यांच्यात तुलना नाही 
महाराष्ट्र

विलीनीकरणाचा फायदा भाजपलाच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पंडित नेहरू-पंतप्रधान मोदी यांच्यात तुलना नाही

‘काँग्रेस आणि प्रादेशिक समविचारी पक्षांचे विलीनीकरण झाल्यास भाजपला त्याचे कोणतेही नुकसान नाही तर फायदाच होईल.

Swapnil S

मुंबई : ‘काँग्रेस आणि प्रादेशिक समविचारी पक्षांचे विलीनीकरण झाल्यास भाजपला त्याचे कोणतेही नुकसान नाही तर फायदाच होईल. जितके विरोधी पक्ष एकत्र होतील तितका अधिकचा राजकीय अवकाश भाजपला प्राप्त होणार आहे. त्यामुळे या पक्षांच्या विलीनीकरणाची भाजप चिंता करत नाही आणि आम्ही सध्या 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहोत’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

काँग्रेस पक्ष हा बुडते जहाज आहे आणि संबंधित प्रादेशिक पक्षांचे नेते अनुभवी आणि राजकीयदृष्ट्या परिपक्व आहेत. त्यामुळे बुडत्या जहाजात कोणी पाय ठेवेल अशी शक्यता नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

नेहरू आणि मोदी यांची तुलना केलेली नाही...

मात्र त्याचवेळी राजकारणात कोणतीही शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी जर अशा प्रकारचे विलीनीकरण झालेच तर त्याचा भाजपला कोणताही तोटा होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांची तुलना नेहरूंसोबत करणे अनावश्यक असल्याचे म्हटले आहे. याकडे लक्ष वेधले असता, कोणीही पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केलेली नाही. फक्त कार्यकाळाबाबत तुलना केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंतच्या सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर असण्याचा नेहरूंचा विक्रम मोडला आहे. नेहरूंपेक्षा जास्त दिवस ते पंतप्रधानपदावर आहेत हे बोलले तर त्यात वावगे काय, असा सवाल फडणवीस यांनी केला. वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रिपदाची पाच वर्षे पूर्ण केली होती, त्यानंतर फक्त मी पूर्ण केली. त्यामुळे कोणी असे म्हटले तर माझी आणि नाईक यांची तुलना केली असे आपण म्हणू शकतो का, नेहरू आपल्या ठिकाणी आणि मोदी आपल्या ठिकाणी आहेत, असे फडणवीस म्हणाले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वैराचारात बदलू नये...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याकडील अर्थखाते मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याकडे घेतले. आता अर्थ खाते पुन्हा मिळावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून होत आहे. याबाबत विचारले असता, आज तरी अर्थखाते माझ्याकडे आहे असे सांगत फडणवीस यांनी त्यावर अधिक बोलण्याचे टाळले.

'बेगानी शादी में...'सारख्यांची ही चर्चा

येथील बिर्ला क्रीडा केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य केले. विलीनीकरणाबाबत काँग्रेस बोलत नाही, ममता बोलत नाहीत. ज्यांचा या विलीनीकरणाशी थेट संबंध नाही, तेच यात जास्त रस दाखवत आहेत. 'बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना'सारखे लोक ही चर्चा सुरू करतात, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना नाव न घेता लगावला.

गुटखा माफियांवर आता ‘मकोका’ लागणार; अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

तडजोडवादी पंतप्रधानांकडून भारतीयांचे रक्षण अशक्य; भारतीय खलाशांच्या मृत्यूवरून राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

डिझेल विक्रीवर मर्यादा! दिवसाला मिळणार केवळ २०० लिटर

भारताच्या GDP आकड्यांत घोटाळा; रघुराम राजन यांनी व्यक्त केली शंका

Mumbai : लोकलमध्ये जागेच्या वादातून चाकू हल्ला