महाराष्ट्र

क्रॉस वोटिंगची भीती; विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान

लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे मनोबल वाढले असून महायुतीच्या गोटात थोडी अस्वस्थता आहे.

Swapnil S

प्रतिनिधी / मुंबई :

विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला मतदान होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने मंगळवारी विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे मनोबल वाढले असून महायुतीच्या गोटात थोडी अस्वस्थता आहे. या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने विधान परिषद निवडणुकीत सर्व पक्षांना क्रॉस वोटिंगची भीती सतावत आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यानच ही निवडणूक होत आहे.

विधान परिषदेतील भाजपचे चार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रत्येकी एक, काँग्रेसचे दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे प्रत्येकी एक, अशा एकूण ११ आमदारांची मुदत येत्या २७ जुलै रोजी संपत आहे. विधानसभेच्या ऐन पावसाळी अधिवेशनात विधान परिषद निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांची धाकधूक वाढली असून अपक्ष आणि मित्रपक्षाच्या आमदारांना सांभाळून घेण्याची कसरत नेत्यांना करावी लागणार आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर प्रथमच विधान परिषदेची निवडणूक होत आहे. जेमतेम १५ दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. हा निकाल भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विरोधात गेल्याने महायुतीच्या आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने अनेक आमदार विधानसभेची उमेदवारी निश्चित करूनच मतदान करण्याची भूमिका घेण्याची शक्यता आहे.

आमदारांचा राजीनामा, आमदारांचे निधन आणि अपात्रतेच्या कारवाईमुळे विद्यमान विधानसभेतील संख्याबळ २८८ वरून २७४ वर आले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी २३ मतांचा कोटा निश्चित केला आहे. विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ लक्षात घेता भाजप आणि छोट्या मित्रपक्षांचे मिळून पाच, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. काँग्रेसचा एक उमेदवार आरामात निवडून येऊ शकतो. पक्षांतर तसेच लोकसभेवर निवडीमुळे काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ ३९ वर आले आहे. परिणामी काँग्रेसने दुसरा उमेदवार दिल्यास त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेसला समाजवादी, एमआयएम, माकप आदी पक्षांची मदत घ्यावी लागेल, तर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांचा मिळून एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपने सहावा उमेदवार दिला किंवा अपक्षाला पुरस्कृत केले, तर विधान परिषदेची निवडणूक अटळ आहे.

विधान परिषद निवडणूक २०२४ चा कार्यक्रम

अधिसूचना जारी : २५ जून

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत : २ जुलै

उमेदवारी अर्जाची छाननी : ३ जुलै

उमेदवारी अर्ज माघारीची मुदत : ५ जुलै

मतदान : १२ जुलै (सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत)

मतमोजणी : १२ जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून

२७ जुलै २०२४ रोजी मुदत संपणारे आमदार

भाजप : विजय गिरकर, नीलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील

काँग्रेस : डॉ. वजाहत मिर्जा, डॉ. प्रज्ञा सातव

शिवसेना शिंदे गट : डॉ. मनीषा कायंदे

शिवसेना ठाकरे गट : अनिल परब

राष्ट्रवादी अजित पवार गट : बाबाजानी दुर्राणी

राष्ट्रीय समाज पक्ष : महादेव जानकर

शेकाप : जयंत पाटील

लोकसभेवर निवडून गेल्याने आमदारांचा राजीनामा : वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखेडे, संदिपान भुमरे, रवींद्र वायकर

राजीनामा : अशोक चव्हाण, राजू पारवे, नीलेश लंके

निधन : गोवर्धन शर्मा, राजेंद्र पटणी, अनिल बाबर, पी. एन. पाटील

अपात्र : सुनील केदार

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी