महाराष्ट्र

महाविकास आघाडीत एकमत नसल्यानेच वेगळी भूमिका - प्रकाश आंबेडकर

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई

महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्येच आपापसात एकमत नाही हे मी पहिल्यापासून सांगत होतो. ते आता दिसून आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वेगवेगळ्या उमेदवारी यादी जाहीर होत आहेत. त्यांचे मतभेद कायम असल्यानेच आता त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा फॉर्म्युला पुढे आणला असल्याचे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्यातच एकमत नसल्याने आम्ही जर त्यांच्यात गेलो असतो तर आणखीनच बिघाडी झाली असती म्हणूनच आम्ही वेगळी भूमिका घेतल्याचे आंबेडकर म्हणाले. काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचे मान्य केले असून त्यापैकी दोन जागांवर पाठिंबा जाहीर केल्याचेही ते म्हणाले.

आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार होती, हे आम्हाला अगोदरपासून माहीत होते. म्हणून आम्ही अशी भूमिका घेतली की, महाविकास आघाडीचे भांडण आधी मिटवा. ते मिटलं की, आम्हाला मतदारसंघ मागायला सोपं होईल. परंतु, वंचित आम्हाला जागा देत नाही, कोणत्या पाहिजे ते सांगत नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. त्यांचा समझोता होत नाही त्याठिकाणी आम्ही जाऊन त्यामध्ये बिघाड होण्याची परिस्थिती टाळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही महत्वाच्या भूमिका घेतल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आम्ही पत्र लिहिले की, मविआमध्ये तुम्हाला ज्या जागा दिल्या आहेत. त्यापैकी सात जागांवर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. दोन जागांवर आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एक कोल्हापूर आणि दुसरी नागपूर. उरलेल्या जागांची त्यांच्याकडून यादी येईल. त्यानुसार आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.

भाजपला एवढ्या सगळ्या पक्षांना सोबत घेण्याची त्यांना गरज का आहे. ज्या मतदारसंघात ते लढत आहेत त्यात त्यांचे प्राबल्य आहे. पण ज्या मतदारसंघात ते लढलेले नाहीत, त्यात त्यांचे प्राबल्य नाही. म्हणून ते प्राबल्य आपल्याला मिळावं म्हणून उमेदवार पळवण्याचा भाग चालला आहे. काही पक्ष फोडीचा भाग चालला आहे. मनसेसारख्या पक्षाला सुद्धा ते सोबत घेत आहेत, असेही आंबेडकर या वेळी म्हणाले.

आमच्या आठ जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे पडल्या

वंचितला सोबत घेण्याच्या महाविकास आघाडीला दोन अडचणी होत्या. एक भारतीय जनता पक्ष, आरएसएस आणि मोदी यांना अंगावर घेण्याची ताकद आमच्यात आहे. दुसरी विस्थापितांच्या सत्तेला प्रस्थापितांचा कायम विरोध राहिला आहे. तसेच, आमचा असा आरोप आहे की, आमच्या आठ जागा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे पडल्या. त्या आठ जागांमध्ये हिंदू मतं मिळाली पण मुस्लीम मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त