मुंबई : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहनमंत्री असतात. मात्र एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली होती. मात्र एकनाथ शिंदे यांची वाढती नाराजी लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची निवड केली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस नाराजीवर फडणवीस यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
२०१४ ते २०१९ महायुती सरकारच्या काळात दिवाकर रावते हे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल परब यांच्याकडे मंत्रिपदाची आणि अध्यक्षपदाची जबाबदारी होती. २०२४मध्ये भरत गोगावले यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. मात्र, गोगावले कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर त्यांना एसटी महामंडळाचा राजीनामा द्यावा लागला. परिवहन मंत्रिपदी प्रताप सरनाईक यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर परिवहन विभागाचे धडाकेबाज निर्णय घेतले होते.
सरनाईक हेच महमंडळाचे अध्यक्ष होतील असे शिंदे गटाचा अंदाज होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परंपरेला छेद देत एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठीची नियुक्ती केली. एका सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक या दोघांसाठी एक मोठा धक्का मानला जात होता. शिंदे आणि फडणवीस यानी कोणताही दुरावा नसल्याचे सभागृहात जाहीरपणे स्पष्ट केले असले तरी शिंदेच्या काळातील कामांना फडणवीसांकडून देण्यात येणारी स्थगिती, रायगड, नाशिक पालक मंत्रिपदाचा तिढा आदी कारणांवरून शिंदे गटात नाराजी पसरली होती.