मुंबई : एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सन १९६० मध्ये स्थापना करण्यात आली. र. गो. सरैया हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे. प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे २६वे अध्यक्ष असणार आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी असलेल्या एसटीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नियुक्तीनंतर केले. तसेच या पदावर नियुक्त करून राज्यातील सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.