मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यानंतर दीक्षाभूमी आणि तिथून माधव नेत्रालय येथे ते जाणार आहेत.
पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने नागपूर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दौऱ्यातील संपूर्ण मार्गाची पाहणी केली. या संपूर्ण मार्गावर भेट देऊन मनपा आणि पोलीस प्रशासनाद्वारे पाहणी करण्यात आली, तसेच आवश्यक ते निर्देश देण्यात आले. मोदींचा हा नागपूर दौरा खूप महत्वाचा असणार आहे.
या दौऱ्यादरम्यान ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मोदींच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी पंतप्रधान रेशीमबागेच्या स्मृती मंदिर स्थळाला भेट देऊन डॉ. हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. यावेळी १५ मिनिटे मोदी स्मृती मंदिर परिसरात थांबणार आहेत. स्मारक समितीच्या वतीने भैय्याजी जोशी पंतप्रधानांचे स्वागत करतील. संघाच्या स्मृती मंदिर स्थळाला भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान असणार आहेत.