संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील आपल्या विधानावर माफी मागण्यास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट नकार दिला आहे. “मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असं म्हणत आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Krantee V. Kale

मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील आपल्या विधानावर माफी मागण्यास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट नकार दिला आहे. “मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असं म्हणत आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

“मी माफी मागणार नाही. मी का माफी मागावी, माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, घटनेने मला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी स्पष्ट केले. चव्हाण यांनी आपल्या विधानाचं समर्थन करताना याबाबत तातडीने अधिक स्पष्टीकरण देण्यास त्यांनी नकार दिला, पण नंतर सविस्तर माध्यमांशी बोलेन असेही ते म्हणाले.

‘ऑपरेशन सिंदूर’बाबत पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते?

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्याच दिवशी भारतीय सैन्याला ‘संपूर्ण पराभव’ सहन करावा लागल्याचा दावा केला होता. त्यांनी असा आरोप केला की, पहिल्याच दिवशी झालेल्या हवाई संघर्षात पाकिस्तानकडून भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली आणि त्यानंतर भारतीय हवाई दलाची सर्व विमाने जमिनीवर होती आणि एकही विमान उडाले नव्हते. “७ तारखेला अर्ध्या तासाचे हवाई युद्ध झाले आणि त्यात भारताचा पूर्ण पराभव झाला. हे कुणी मान्य करो वा न करो, सत्य हेच आहे,” असं चव्हाण म्हणाले होते. पुढे त्यांनी असा दावाही केला की, त्या संघर्षानंतर ग्वालियर, भठिंडा आणि सिरसा येथील हवाई तळांवरून कोणतंही भारतीय विमान उडू शकले नाही, कारण त्यांना पाडलं जाण्याचा धोका होता.

भाजपकडून जोरदार टीका

या वक्तव्यानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजप नेत्यांनी काँग्रेसवर थेट सैन्याचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेस नेतृत्वावर टीका केली. “सैन्याचा अपमान करणं ही काँग्रेसची ओळख बनली आहे,” असं पूनावाला म्हणाले. त्यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधत, अशा वक्तव्यांवर पक्षांतर्गत कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनीही प्रतिक्रिया देत, “देशाच्या लष्कराच्या शौर्याचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही नाही,” असं स्पष्ट केलं. काँग्रेसकडून सातत्याने सशस्त्र दलांचा अवमान केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसची सावध प्रतिक्रिया

वाद वाढत असताना काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला आहे. झारखंडमधील काँग्रेसचे खासदार सुखदेव भगत यांनी पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. “राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर काँग्रेस सशस्त्र दलांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचे स्रोत ते स्वतःच सांगू शकतात, मात्र काँग्रेसला आपल्या लष्कराचा अभिमान आहे,” असं भगत म्हणाले.

दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’वरील वादाचे पडसाद आता संसदेत उमटण्याची शक्यता आहे.

फ्रान्स अध्यक्षांच्या भारत दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ होणार; दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त, मुंबईत आज मोदी-मॅक्रॉन द्विपक्षीय बैठक

राज्य सरकारने मागवली थकीत शेतकरी कर्जदारांची माहिती

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

राजस्थानमध्ये कारखान्यातील स्फोटात ७ जणांचा मृत्यू

‘चेक बाऊन्स’ प्रकरणात राजपाल यादवला कोर्टाचा दिलासा