महाराष्ट्र

Pune : AI चा गैरवापर! डेटिंगसाठी तरुणीचा नकार; आरोपीने तयार केले अश्लील फोटो, मैत्रिणींनाही ब्लॅकमेल

पुण्यातील बावधन परिसरात AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तरुणीचे बनावट अश्लील फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुंबईतून एका तरुणाला अटक केली आहे. आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख ऑनलाईन गेम ‘बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया’ (BGMI) द्वारे झाली होती.

Mayuri Gawade

पुण्यातील बावधन परिसरात AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तरुणीचे बनावट अश्लील फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुंबईतून एका तरुणाला अटक केली आहे. आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख ऑनलाईन गेम ‘बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया’ (BGMI) द्वारे झाली होती.

गेममधून ओळख आणि सोशल मीडियावर चॅटिंग

२१ वर्षीय पीडित तरुणी पुण्यातील एका महाविद्यालयात MBA करत आहे. या प्रकरणी तिने बावधन पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ दखल घेत चिराग राजेंद्र थापा (वय २१, रा. विरार, पूर्व) या तरुणाला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी व पीडित तरुणीची ओळख BGMI गेमच्या माध्यमातून झाली होती. या गेममध्ये खेळाडू अनोळखी लोकांशी ‘मॅचमेकिंग’, ‘टीम लॉबी’ किंवा ‘व्हॉइस चॅट’द्वारे संपर्क साधू शकतात.

नातेसंबंधास नकार दिल्याने संताप

आरोपीने गेमदरम्यान ओळख झाल्यानंतर स्नॅपचॅट आणि इंस्टाग्रामवरून तरुणीशी संपर्क साधला. त्याने तिला ‘डेट’वर येण्याची आणि आपली मैत्रीण होण्याची मागणी केली, मात्र तरुणीने यासाठी नकार दिला. नकार मिळाल्यावर आरोपी संतापला आणि त्याने तरुणीच्या नावाने तब्बल १३ बनावट इंस्टाग्राम प्रोफाईल तयार केल्या. या प्रोफाइलमधून पीडित तरुणीला धमक्या दिल्या. त्यानंतर AI च्या मदतीने तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले.

मैत्रिणींचेही अश्लील फोटो केले तयार

हे फोटो तरुणीच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि इतर मैत्रिणींनाही पाठवले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने तिच्या इतर मैत्रिणींचेही असेच फोटो तयार केले आणि त्यांना पीडितेला त्याच्याशी बोलण्यास आणि त्याचा प्रेम प्रस्ताव स्वीकारण्यास सांगितले.

तांत्रिक तपासातून आरोपीचा ठावठिकाणा

या प्रकरणी तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपीचा शोध लावला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार अंबरिश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक बंडू मरने, पोलीस शिपाई अरुण नरळे आणि स्वप्निल साबळे यांनी कर्जत येथे छापा टाकून आरोपी थापाला अटक केली.

पोलिसांनी आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) भास्कर कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

डिजिटल युगात मुलींच्या सुरक्षेबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांना चिंता

'पंतप्रधान धन-धान्य कृषी' योजनेचा शुभारंभ; ४२ हजार कोटींची योजना

चीनवर १०० टक्के टॅरिफ; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

आजचे राशिभविष्य, १२ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Mumbai : मेट्रो मार्गिका २ए आणि ७ च्या प्रवाशांसाठी मोठी बातमी; १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान सकाळच्या वेळापत्रकात बदल