हवाई दलाच्या 'हार्ड लँडिंग'मुळे पुणे विमानतळ ९ तास बंद 
महाराष्ट्र

हवाई दलाच्या 'हार्ड लँडिंग'मुळे पुणे विमानतळ ९ तास बंद

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रात्री भारतीय हवाई दलाच्या एका विमानाचे 'हार्ड लँडिंग' झाल्याने मोठी खळबळ उडाली.

Swapnil S

पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रात्री भारतीय हवाई दलाच्या एका विमानाचे 'हार्ड लँडिंग' झाल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे विमानतळाची धावपट्टी तब्बल नऊ तासांसाठी बंद करण्यात आली होती, ज्याचा मोठा फटका १०६ विमानांना बसला. तब्बल ९९ विमान उड्डाणे रद्द करण्यात आली, तर ७ विमाने वळविण्यात आली. शुक्रवारी रात्री १०:२५ वाजता ही घटना घडली. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ प्रशासनाने सर्व उड्डाणे तत्काळ स्थगित केली होती.

पुण्यातील लोहेगाव येथील हवाई दलाच्या तळावर विमानाचा सराव सुरू असताना हे विमान धावपट्टीवर उतरत होते. लडिंगच्या वेळी विमानाच्या यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे 'हार्ड लैंडिंग' झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस आणि विमानतळ सूत्रांनी वर्तवला आहे. सुदैवाने, विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित असून कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. मात्र, विमान धावपट्टीवरच अडकल्यामुळे विमानतळाचे नागरी कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते.

अपघातामुळे विमान प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. धावपट्टी बंद झाल्यामुळे विविध विमान कंपन्यांची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. यामध्ये इंडिगो एअरलाईन्सला सर्वाधिक फटका बसला असून, त्यांची ३१ आगमन आणि ३४ प्रस्थान अशी एकूण ६५ उड्डाणे रद्द झाली. एअर इंडियाने ३ आगमन आणि ३ प्रस्थान, तर एअर इंडिया एक्स्प्रेसने ५ आगमन आणि ५ प्रस्थान उड्डाणे रद्द केली. स्पाईसजेट आणि अकासा एअरची देखील प्रत्येकी ५ उड्डाणे रद्द करण्यात आली. इंडिगोने प्रवाशांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी केली असून, विमानतळावर निघण्यापूर्वी फ्लाईटचे स्टेटस तपासण्याचे आवाहन केले आहे. तसेच बाधित प्रवाशांना 'प्लॅन बी' अंतर्गत तिकिटाचे पूर्ण पैसे परत मिळवणे किंवा दुसऱ्या विमानाचे बुकिंग करण्याचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, धावपट्टी लवकरात लवकर खुली करण्यासाठी हवाई दलाचे जवान आणि विमानतळ प्रशासनाने रात्रभर युद्धपातळीवर काम केले. विमानाला धावपट्टीवरून हटवून आवश्यक सुरक्षा तपासणी पूर्ण केल्यानंतर, शनिवारी सकाळी ७:३० वाजता प्रस्थान आणि ८:०० वाजता विमानांचे आगमन पुन्हा सुरू करण्यात आले. हवाई दलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकृतपणे माहिती दिली की, धावपट्टी आता पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली असून विमान वाहतूक टप्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे.

काँग्रेसच्या महिलाविरोधी भूमिकेमुळे देशाचे नुकसान! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल

...तर इराणवर पुन्हा हल्ले - डोनाल्ड ट्रम्प

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे पुन्हा निर्बंध; अमेरिकेने कराराचा भंग केल्याचा आरोप

आजचे राशिभविष्य,१९ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Akshaya Tritiya 2026 : आज अक्षय्य तृतीया; 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी, जाणून घ्या सविस्तर