आज मध्यरात्री पुणे बंगलोर महामार्गावर पुण्यातील नवले पुलाजवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, जखमींवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मात्र, या अपघातामुळे पुन्हा एकदा नवले पुलाजवळील प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. याआधी अनेकदा या पुलाजवळ भीषण अपघात झालेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला साखरेची वाहतूक करणार्या ट्रकने मागून धडक दिली. या ट्रॅव्हल्समध्ये २५ प्रवासी होते. या धडकेत ट्रॅव्हल्स आणि ट्रक दोन्हीही पलटी झाले. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले. साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचे उतारावर नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, तब्बल २ तास या ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न सुरु होते.