पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतरे यांच्या १२ वर्षीय मुलीचा बारामती येथे संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी समोर आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील रूई गावातील साईनगर परिसरात मुलीचा मृतदेह तिच्या घराजवळ आढळून आला. शनिवारी काही कारणावरून आईसोबत किरकोळ वाद झाल्यानंतर मुलगी रागाच्या भरात घरातून बाहेर पडली होती. मात्र, ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
रविवारी सकाळी तिचा मृतदेह घराजवळ आढळल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तो बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. “प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व संभाव्य बाजूंचा विचार केला जात आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.