संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

"आम्ही जर युती म्हणून सोबत निवडणूक लढवली तर..."; पुण्यात अजित पवारांच्या NCP सोबत का नाही लढणार? फडणवीसांनी केलं स्पष्ट

फडणवीस म्हणाले की, पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप पक्ष समोरासमोर लढतील. या संदर्भात माझी अजित पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून, आम्हाला दोघांनाही पुण्याच्या...

Krantee V. Kale

पुणे : राज्यातील २९ मनपांच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली असून, महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पुण्यामध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला आणि महानगरपालिका निवडणुकांबाबत भाष्य केलं.

राज्यातील सत्तेत असणारे तीन पक्ष महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवणार का? यावर तर्कवितर्क लढवले जात होते. विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र लढणार का? या संदर्भात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चर्चांचा सस्पेन्स संपवत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप हे युती म्हणून निवडणूक लढवणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. या निर्णयामुळे पुण्यात महायुती तुटल्याची घोषणाच देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे स्पष्ट झाले.

...तर तिसऱ्याचा फायदा होईल - फडणवीस

फडणवीस म्हणाले की, पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप पक्ष समोरासमोर लढतील. या संदर्भात माझी अजित पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून, आम्हाला दोघांनाही पुण्याच्या राजकारणाची कल्पना आहे, त्यामुळे आम्ही एकत्रित निवडणूक लढवू शकत नाही. आम्ही जर युती म्हणून सोबत निवडणूक लढवली, तर तिसऱ्याचा फायदा होईल, हे आम्ही जाणतो, त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही एकमेकांच्या समोरासमोर निवडणूक लढणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, समोरासमोर लढत होणार असली तरी, ही लढाई ‘मैत्रीपूर्ण’ असेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शिंदेंची शिवसेना आमच्या सोबत - फडणवीस

पुण्यात राष्ट्रवादीसोबत युती न करताही, इतर ठिकाणी महायुती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगरपालिका निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढलेले शिवसेना आणि भाजप हे महापालिका निवडणुकीत मात्र एकत्रित दिसणार आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमच्यासोबत असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भात आम्ही अत्यंत सकारात्मक असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. तर एकनाथ शिंदे आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना घेणार नाहीत, हे ही आमचे ठरल्याचे फडणवीस म्हणाले.

पुणेकरांचा कौल भाजपला मिळेल असा विश्वास

दरम्यान, पुण्यात भाजपने ५ वर्ष चांगला विकास केला असून, आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. त्यामुळे जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल, असा आम्हाला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरही केलं भाष्य

दरम्यान, ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला फटका बसेल का, या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईकरांनी भाजप आणि शिवसेनेने केलेल्या विकास कामांचा आणि मराठी माणसाच्या हिताचा विचार केला आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्रित आले किंवा नाही आले, तरी मुंबईकर आमच्या महायुतीलाच निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; १३ वर्षं कोमात असलेल्या हरीश राणाच्या इच्छामरणाला मंजुरी

Mumbai : विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळली मोठी दुर्घटना

IRCTCचा महत्त्वाचा निर्णय; LPG टंचाईमुळे रेल्वे केटरिंगमध्ये इंडक्शन वापरण्याचे निर्देश

इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम

LPG Saving Tips : गॅस बचतीसाठी Indian Oilचा सल्ला; 'या' टिप्स ठेवा लक्षात