पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील नवले पुलावर भरदिवसा एका मोठ्या व्यावसायिकाला लुटण्याचा चित्रपटालाही लाजवेल असा थरार घडला असून, याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचारी आणि तोतया पत्रकारासह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार मानल्या जाणारा तोतया पत्रकार आशिष तिवारी याला अटक केली आहे, तर दोन पोलिसांसह इतर सहा आरोपी अद्याप फरार आहेत.
व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांच्याकडून १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा हा कट पोलिसांनी रचल्याचे समोर आले आहे.
१८ जुलै २०२६ रोजी व्यावसायिक हर्षवर्धन पवार हे त्यांचे सहकारी किरण आपटे यांच्यासह १ कोटी रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी कारने निघाले होते. ही रोकड घेऊन ते नऱ्हे येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेकडे जात असताना, सिंहगड रस्त्यावरील हॉटेल ब्रह्मा येथून त्यांचा पाठलाग सुरू झाला. कार नवले पुलाजवळ पोहोचली असता, दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी कारसमोर आडवी गाडी लावून ती थांबवली. ‘आम्ही पोलीस आहोत, तुमच्याकडे बेनामी रोकड असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे,’ अशी बतावणी करून आरोपींनी पवार यांना धमकावले. पवार यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि १ कोटी रुपये असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. पवार यांनी दाखवलेल्या प्रचंड धाडसामुळे दरोडेखोरांना पूर्ण रक्कम लंपास करता आली नाही; पवार यांनी एक बॅग स्वतःकडे घट्ट पकडून ठेवली होती.
दबावामुळे पोलीस, पत्रकारांची नावे टाकली
सध्या या गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपी पोलीस कर्मचारी प्रमिला निकम आणि अजिज मेस्त्री हे फरार असून, त्यांच्यासोबतच अभिजीत ऊर्फ बटऱ्या बाळासाहेब गाडे, दाऊद सय्यद नदाफ, आकाश ऊर्फ मुन्ना संजय गायकवाड आणि प्रमोद विजयकुमार यादव यांचा पोलीस शोध घेत आहेत. सुरुवातीला नऱ्हे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पोलीस आणि पत्रकाराची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप झाला होता, मात्र प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे अखेर पोलिसांनी पुरवणी एफआयआर दाखल करून या सर्वांचा आरोपी म्हणून समावेश केला आहे.