पुणे : महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरण्याऐवजी चुकून कार पार्किंगच्या परिसरात उतरवण्यात आल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळ उडाला. सुदैवाने, या अनपेक्षित प्रकारानंतरही कोणतीही हानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर लँडिंगच्या वेळी पंख्यांमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडाली, ज्यामुळे दृश्यमानता कमी झाली. यामुळे वैमानिकाचा गोंधळ झाला आणि त्याने पार्किंगमधील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचे समजून तिथेच हेलिकॉप्टर उतरवले. सुदैवाने, या अनपेक्षित प्रकारात मंत्री भुजबळ आणि वैमानिक दोघेही पूर्णपणे सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पार्किंगमध्ये काही वाहने उभी असली तरी कोणालाही इजा झाली नाही.
हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरल्याचे लक्षात येताच घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ वैमानिकाला या चुकीची जाणीव करून दिली. त्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा हवेत झेपावून नियोजित हेलिपॅडवर योग्यरित्या उतरवण्यात आले. या प्रकारानंतरही छगन भुजबळ यांनी आपले नियोजित कार्यक्रम कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण केले. या घटनेवर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले की, हा अपघात नव्हता, आम्ही सर्व सुरक्षित आहोत. केवळ हेलिपॅड न दिसल्यामुळे पायलटने कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवले.
अजित पवार यांच्या विमाना बारामतीतील अपघाताची घटना ताजी असताना हा प्रकार घडल्याने त्याची विशेष चर्चा होत आहे.
लोकवस्तीजवळ अशा प्रकारची चूक मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकली असती, अशी भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, हेलिपॅडच्या खुणा स्पष्ट होत्या का, ही मानवी चूक होती की काही तांत्रिक बिघाड, याची सखोल चौकशी केली जाणार आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक कडक देखरेख आणि समन्वयाची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.