अवकाळीचे थैमान! मुसळधार पावसामुळे पुण्यात जागोजागी पूर, जनजीवन विस्कळीत, वीज गायब; महिला ठार 
महाराष्ट्र

अवकाळीचे थैमान! मुसळधार पावसामुळे पुण्यात जागोजागी पूर, जनजीवन विस्कळीत, वीज गायब; महिला ठार

पुणे शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने गुरुवारी दुपारी रौद्र रूप धारण केले.

Swapnil S

पुणे : पुणे शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने गुरुवारी दुपारी रौद्र रूप धारण केले. अवघ्या दोन तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळीत झाले, तर सिंहगड रस्ता परिसरात झाड अंगावर कोसळून एका ६० वर्षीय फूल विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते, तर अनेक भागांतील वीजपुरवठाही खंडित झाला होता.

सिंहगड रस्ता येथील नवश्या मारुती मंदिराजवळ रंजना नवनाथ गिरी (वय ६०, रा. दत्तवाडी, गणेश मळा) ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून फुलांची विक्री करून आपला उदरनिर्वाह करत होती. गुरुवारी हनुमान जयंती असल्याने त्या पहाटेपासूनच मंदिराजवळील आपल्या टपरीमध्ये व्यवसायासाठी बसल्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

यावेळी मंदिराशेजारील वडाचे एक भले मोठे झाड अचानक त्यांच्या टपरीवर कोसळले. या दुर्घटनेत रंजना गिरी झाडाखाली दबल्या गेल्याने गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत त्यांना झाडाखालून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काही तासांत रस्ते झाले जलमय

शहरात झालेल्या या मुसळधार पावसामुळे शिवाजीनगर, कोथरूड, पाषाण, खराडी, चंदननगर, लोहगाव आणि सिंहगड रस्ता या भागांत पावसाचा जोर सर्वाधिक होता. अवघ्या काही तासांत रस्ते जलमय झाल्याने नदीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अलका टॉकीज चौकातील एका रुग्णालयात पावसाचे पाणी शिरल्याने रुग्ण आणि प्रशासनाची मोठी धांदल उडाली. तसेच स्वारगेट आणि वाकडेवाडी येथील एसटी स्थानकांमध्ये पाणी साचल्याने प्रवाशांना साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागली. दुपारी पडलेल्या या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र अंधार दाटून आला होता, ज्यामुळे वाहनचालकांना दिवसाही दिवे लावून वाहने चालवावी लागली.

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला गारपिटीचा इशारा; मुंबई, उपनगरांमध्ये बरसणार हलक्या सरी

Good Friday 2026 : गुड फ्रायडेचा अर्थ काय? या दिवशी मासे का खातात?

आजचे राशिभविष्य, ३ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

एप्रिल महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

नियमांच्या जंजाळात शैक्षणिक क्षेत्र!