महाराष्ट्र

पुणे : हिंजवडीत बस पेटल्याने चार कामगारांचा होरपळून मृत्यू

हिंजवडी आयटी पार्कमधील ‘व्योम ग्राफिक्स’ या कंपनीतील कामगारांना वारजे माळवाडी येथून घेऊन येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागून झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

Swapnil S

पुणे : हिंजवडी आयटी पार्कमधील ‘व्योम ग्राफिक्स’ या कंपनीतील कामगारांना वारजे माळवाडी येथून घेऊन येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागून झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. आग एवढी भीषण होती की चारही कामगारांना बसमधून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि चौघांचाही अक्षरश: कोळसा झाला. या घटनेत अन्य सहा कामगार जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, एका महिलेसह चार कामगारांनी प्रसंगावधान राखत बसमधून उडी मारल्याने ते सुखरूप बचावले. ही घटना बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास हिंजवडी आयटी पार्कमध्ये विप्रो सर्कलजवळ घडली.

शंकर कोंडिबा शिंदे (वय ६३, रा. नऱ्हे, आंबेगाव), गुरुदास खंडू लोखरे (वय ४०, रा. हनुमाननगर, पौड फाटा) सुभाष सुरेश भोसले (वय ४५, रा. त्रिलोक सोसायटी, वारजे माळवाडी), राजेंद्र सिद्धार्थ चव्हाण (वय ४२, रा. सिंहगड रोड, वडगाव बुद्रूक) अशी मृत्यूमुखी पडलेल्या चार कामगारांची नावे आहेत. तर, बसचालक जनार्दन हंबर्डीकर, विश्वास खानविलकर, चंद्रकांत मलजी, प्रवीण निकम, संदीप शिंदे, विश्वास जोरी हे चार कामगार जखमी असून त्यांच्यावर हिंजवडीतील रूबी हॉल रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींपैकी दोन जण ४० टक्क्यांहून अधिक भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. एक कामगार २० टक्के, तर एक जण ५ टक्के भाजला असून एक कामगार किरकोळ भाजला आहे. तर विश्वास गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदीप राऊत यांनी प्रसंगावधान राखत बसच्या दरवाजातून उडी मारल्याने ते बचावले.

हिंजवडी आयटी पार्कमधील फेज - २ मध्ये ‘व्योम ग्राफिक्स’ या नावाने प्रिटींग प्रेस कंपनी आहे. अपघातग्रस्त सर्व कामगार या कंपनीत कामाला असून, कंपनीत सकाळ आणि दुपार अशा दोन पाळीत काम चालते. सकाळच्या पाळीत आठ ते साडेचार अशी कामाची वेळ आहे. कंपनीतर्फे कामगारांची ने-आण करण्यासाठी बसची सोय आहे. बसचालक हंबर्डीकर हे दररोज सकाळी साडेसहा वाजता वारजे माळवाडी येथून कामगारांना बसमध्ये घेतात आणि पावणेआठला बस कंपनीत पोहोचते. बुधवारी सकाळी हंबर्डीकर यांनी नेहमीप्रमाणे वारजे येथून १२ कामगारांना घेतले. त्यानंतर चांदणी चौकात साडेसात वाजता एका कामगाराला घेतले. कामगारांना घेऊन बस हिंजवडी येथे विप्रो सर्कल चौकाजवळ आली असताना अचानक बसच्या पुढील भागातून धूर येऊ लागला. काही कळायच्या आत आग लागली. चालकाच्या पायाला भाजल्याने त्याने त्वरीत उडी मारली. बस रस्ता दुभाजकाला जाऊन धडकून थांबली. काही क्षणात आगीने बसला वेढा घातला.

बसमध्ये पुढील सीटवर बसलेल्या मंजिरी आडकर या महिलेसह चार जणांनी प्रसंगावधान राखत बसमधून खाली उडी मारली. त्यांच्या मागे असलेल्या तीन जणांना आगीची झळ बसली. तर त्यांच्या मागे असलेल्या दोघांनी पेट घेतला. या पाचही जणांनी पेटत्या अवस्थेत बसमधून खाली उडी मारली. यात दोघे कामगार गंभीर भाजले. मात्र, पाठीमागील आसनावर बसलेल्या उर्वरीत चार कामगारांना बसमधून खाली उतरायची संधीच न मिळाल्याने ते बसमध्ये अडकले. त्यांनी बसचा पाठीमागील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा उघडला गेला नाही आणि काही क्षणात आगीने चौघांनाही आपल्या कवेत घेतले. गुदमरून आणि होरपळून या चारही कामगारांचा मृत्यू झाला.

आगीत चारही मृतदेहांचा कोळसा झाला

या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी एमआयडीसी अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला. जवानांनी पाण्याचा फवारा मारून काही वेळात आग विझविली. आगीत बसमधील चारही मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी बसचा पाठीमागील दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढले. रूग्णवाहिकेतून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात नेण्यात आले. तर, जखमींना रूबी हॉल रूग्णालयात दाखल करण्यात आले.

हिंजवडी असोसिएशनसमवेत बैठक

हिंजवडीतील या आग दुघर्टनेची माहिती परिसरातील कंपनी व्यवस्थापनांना दिली जाईल. कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या बसच्या देखभालीबाबत काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. त्यासाठी असोसिएशनसोबत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.

बसला शॉर्टसर्किटमुळे आग?

''बसला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे प्राथमिकदृष्ट्या सांगण्यात येत आहे. बसची देखभाल-दुरूस्ती झाली होती की नाही याचा तपास सुरू आहे. प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून अचानक आग कशी लागली, याबाबतचा तांत्रिक तपास करण्यात येईल.''

- विशाल गायकवाड (पोलीस उपायुक्त)

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत